मुंबई : उपासमार होऊ लागल्याने, प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) मागण्यांबाबत मंगळवारी निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी ॲप आधारित टॅक्सी-रिक्षाचालकांनी काम बंद आंदोलन शनिवारी तात्पुरते स्थगित केले होते. आरटीओ आणि ॲप आधारित टॅक्सी चालकांची मंगळवारी बैठक होत असून या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊ न शकल्यास मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात ‘चक्का जाम’ करण्याचा इशारा ॲप आधारित टॅक्सी चालकांनी दिला आहे.
ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांनी १५ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. परंतु, हातावर पोट असलेल्या चालकांच्या कुटुंबाला आंदोलनाची झळ बसू लागली. त्यामुळे ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांनी १९ जुलै रोजी काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९, २०, २१ जुलै रोजी चालकांनी सेवा दिली. तसेच २२ जुलै कमविण्याचा शेवटचा दिवस असल्याने, या दिवशी एवढे पैसे कमविता येतील, तेवढे कमवा. तसेच हे पैसे फक्त स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी वापरा. जर, राज्य सरकार, आरटीओ बैठकीत सकारात्मक भूमिका न घेतल्यास बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू करायचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी केले.
‘ओन्ली मीटर’वरील दराबाबत संमिश्र प्रतिसाद
ॲप आधारित टॅक्सी चालकांची संबंधित ॲग्रीगेटर कंपन्यांकडून कायम पिळवणूक केली गेली. त्यांना प्रति किमी ८ ते १२ रुपयांप्रमाणे भाडे देण्यात आले. आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार ॲग्रीगेटर कंपन्यांनी पैसे द्यावेत, अशी चालकांची मागणी आहे. शनिवारी संप मागे घेतल्यानंतर चालकांनी ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळाचा वापर करून दर आकारण्यास सुरुवात केली. प्रति किमी ३२ रुपयांप्रमाणे दर आकारण्यात येत आहेत. प्रवाशांनी ओला, उबर किंवा इतर ॲपवरून टॅक्सी-रिक्षा आरक्षित केल्यानंतर, त्या ॲपवर दर्शविण्यात येणारे भाडे न आकारता, ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरून भाडे आकारले जात आहे.
ॲपवर दर्शविणारे किमीचे अंतर ‘ओन्ली मीटर’ संकेतस्थळावर नमुद केल्यानंतर दाखविण्यात येणाऱ्या एकूण प्रवास भाड्याची रक्कम आकारली जाते. परंतु, ओला, उबर या ॲपवरील भाडे आणि ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरील भाडे या तफावत असल्याने, प्रवासी आणि चालक यांच्यात वाद होत आहेत. परंतु, काही प्रवाशांना याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रवाशांची होणार कोंडी
मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक येथील बहुसंख्य प्रवासी ॲप आधारित टॅक्सीचा वापर करतात. जर, पुन्हा ॲप आधारित टॅक्सी चालकांचे काम बंद आंदोलन सुरू झाल्यास, प्रवाशांचे प्रचंड हाल होतील. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील प्रवाशांचा प्रवास खोळंबा होईल.