मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी या परिस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती उदभवली त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना नाकारता येणार नाही. ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असे शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईतील पावसाचा मतदानावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर शेलार म्हणाले कि, यापूर्वी आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली पण यावेळी भाजपा विजयाच्या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरला आहे. आम्ही नक्कीच विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाऊस असला तरी मतदारांमध्ये उत्साह आहे असे ते म्हणाले.

मुंबईचे महापौर म्हणतात..
आज मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मते मुंबईला कुठेही ब्रेक लागला नाही. मुंबईत कुठेच पाणी साचले नाही असा दावा विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगले काम केल्याचे प्रशस्तीपत्रकच दिले आहे.
मुंबईत कुठेही पाणी तुंबल नाही काही दुर्घटना घडल्या पण त्यामध्ये जिवीतहानी झाली नाही हे सुदैव असे महाडेश्वर म्हणाले. मी सकाळापासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी थोडस साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं अस ते म्हणाले. महापालिकेते अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bjp chief ashish shelar held shivsena responsible for water logging