मुंबई : सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या पदपथावर मुंबई महापालिकेने अत्याधुनिक असे बायो टॉयलेट अर्थात जैव शौचालये तयार केली आहेत. या पदपथावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी या ठिकाणी सहा ठिकाणी अशी अत्याधुनिक प्रसाधनगृहे तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन ठिकाणची प्रसाधनगृहे सुरू करण्यात आली आहेत.

वरळी डेअरी येथील प्रसाधनगृह आधीच सुरू करण्यात आले असून बिंदू माधव ठाकरे चौक येथे आणखी एक प्रसाधनगृह सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गालगतच भलामोठा विस्तीर्ण असा समुद्री पदपथ तयार करण्यात आला आहे. सागरी किनारा मार्गाला लागून असलेला सर्वात मोठा पदपथ साडेसात किमी लांबीचा आहे. त्यापैकी सव्वापाच किमी लांबीचा पदपथ १५ ऑगस्टला खुला झाला. या पदपथाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने सहा ठिकाणी अत्याधुनिक अशी प्रसाधनगृहे तयार करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी दोन प्रसाधनगृहे नुकतीच सुरू झाली आहेत.

मरीन ड्राईव्ह येथील साडेतीन किमी लांबीच्या समुद्री पदपथापेक्षाही लांब असा समुद्री पदपथ सागरी किनारा मार्गालगत आहे. या पदपथावर फिरायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वरळी परिसरात भूमिगत वाहनतळ तयार करण्यात आले असून पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे या वाहनतळाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. आता या पर्यटकांसाठी सहा ठिकाणी प्रसाधनगृहे तयार करण्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने ठरवले आहे.

या प्रसाधनगृहात जैव शौचालये तयार करण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यालगत मलनिस्सारण वाहिन्या नसल्यामुळे तेथे जैव शौचालये तयार केली जाणार आहेत. त्यात शौचालयांमध्ये सूक्ष्मजंतूंचा वापर करून विष्ठेचे पाण्यात आणि बायोगॅसमध्ये रूपांतर केले जाते. ज्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाची हानी टळते, अशी योजना आहे. या पदपथालगत हाजी अली, महालक्ष्मी आणि आणखी दोन ठिकाणी अशी प्रसाधनगृहे तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रसाधनगृहात या सुविधा….

महिलांसाठी दोन शौचकूप, लहान मुलांसाठी कमोड, अपंगांसाठी कमोड, पुरुषांसाठी एक शौचकूप, वॉश बेसीन, अत्याधुनिक आरसा, साबण व पाण्याची सोय, खिडक्या, पंखा, एक हजार लीटरची पाण्याची टाकी, सौर उर्जा पॅनेल, सॅनिटरी पॅड विल्हेवाटीचे यंत्र अशी सोय आहे.