मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी गुरूवारी ठेवली आहे. तसेच, तोपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यास मज्जावही केला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे गुरूवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांच्यासह अन्य सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, एमसीए कार्यकारणी निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत कोणतीही घाई न करण्याचे आणि परिस्थिती यथास्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने एमसीएच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांचा विचार करून त्याबाबतचा आदेश कारणमीमांसेसह याचिकाकर्त्यांना कळवण्यात येईल, अशी हमी निवडणूक अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने त्याची दखल घेतली व याचिकेवरील सुनावणी गुरूवारी ठेवली. तसेच, उपरोक्त आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.

घटनेचे उल्लंघन होणे आणि नियमबाह्यपणे १५५ हून अधिक क्रिकेट क्लबना मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करून याचिकाकर्त्यांनी या निवडणुकीला आव्हान दिले आहे. एमसीएच्या निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली होती. या यादीवर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी आपल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या होत्या. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या हरकती फेटाळल्या. त्यासाठी कोणतीही कारणे दिली नाहीत आणि उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर केली, असा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे.

तसेच, एमसीएच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर आपल्या हरकती फेटाळल्या याची कारणे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत. त्यामुळे, या कारणांचा सविस्तर खुलासा करण्याचे आदेश संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मुख्य मागणी याचिकेत केली आहे. तथापि, प्रारुप मतदार यादीविषयी १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान आलेल्या आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम यादी जाहीर केली. त्या प्रक्रियेत याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांचाही विचार केल्याचा प्रतिदावा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला.

म्हणून ही निवडणूक महत्त्वाची

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांचा सहभाग असून त्यात भाजपचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे (ठाकरे) मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. याशिवाय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांनीही अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. त्यात मुंबई टी-२० लीगच्या अध्यक्षपदासाठी सात, कार्यकारीणी सदस्यासाठी नऊ, तर अध्यक्षपदासाठी एकूण १४ अर्ज आले आहेत. उपाध्यक्षपदासाठी दहा, सचिवपदासाठी १०, सहसचिवपदासाठी नऊ आणि खजिनदारपदासाठी आठ अर्ज आले आहेत. त्याचबरोबर कार्यकारीणी पदासाठी ४८ अर्ज आले आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी या सुद्धा शर्यतीत आहेत. एडलजी या एकमेव क्रिकेटपटू उमेदवार आहेत.