मुंबई : अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा असलेल्या संशयीत आरोपीचे अपहरण करून त्याला ३२ दिवस डांबून ठेवून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपींनी त्यांच्या कुटुंबियांकडून ३ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने त्याची सुटका केली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आले असून त्यातील एक दाऊदचा विश्वासू छोटा शकीलशी संबंधीत असल्याचा संशय आहे. आरोपींना न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जून रोजी, ओशिवरा येथील हॉटेलमधून साजिद इलेक्ट्रिकवाला आणि त्याचा साथीदार शब्बीर सिद्दीकी यांना जबरदस्तीने मोटरगाडीत बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील एका फार्महाऊसमध्ये नेले आणि तेथे अमानुष मारहाण केली. त्यांना तेथे डांबून ठेवले असता सिद्दीने खिडकीचे तीन गज काढून तेथून पलायन केले. त्यानंतर तो कुर्ला येथील आपल्या घरी पोहोचला.
काय घडले?
सिद्दीकी पळाल्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने आरोपी नेरळ सोडून नाशिक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत ठिकाणे बदलत राहिले. आरोपींचा म्होरक्या सरवर खान याने यावर्षाच्या सुरूवातीला अपहरण करण्यात आलेल्या साजिद इलेक्ट्रिकवालाला ५० लाख रुपये दिले होते. इलेक्ट्रिकवाला मेफेड्रोन (एमडी) हा अमलीपदार्थ कसा बनवायचा याची माहिती असल्यामुळे त्याने त्याला ती रक्कम दिली होती. पण इलेक्ट्रिकवालाने पैसे परत केले नाहीत. शिवाय त्याला माहितीही दिली नाही. अखेर खानच्या सांगण्यावरून इलेक्ट्रिकवालाचे अपहरण करून त्याला मारहाण केली.
तसेच इलेक्ट्रिकवाल्याच्या पत्नीला दूरध्वनी करून तिच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांना ५० लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडून आणखी रक्कम काढण्याचा कट रचला व सुटकेसाठी आणखी तीन कोटींची मागणी केली. त्याला विविध ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. इलेक्ट्रिकवालाचे कुटुंबिय गुजरातमधील सूरतमध्ये राहात असल्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र, जुलै महिन्यातही साजिदची सुटका न झाल्याने सिद्दीकीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि १० जुलैला गुन्हा दाखल केला.
ते प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सहा पथकांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेऊन मंगळवारी उत्तर प्रदेशातील बांदा येथे छापा टाकत साजिद इलेक्ट्रिकवालाची सुटका केली.
सात आरोपी अटकेत
याप्रकरणात उत्तर प्रदेशातून सरवर खान, राहुल सावंत आणि मेहताब अली, तर मुंबई व रायगडमधून संतोष वाघमारे, सतीश काडू, युनिस टेवरपल्ली आणि तौसिफ संधी यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ७ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी संशयितांनाच शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
गुन्हेगारीचा पूर्व इतिहास
अपहरण करण्यात आलेला साजिद इलेक्ट्रिकवाला याला यापूर्वी २०१५ मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(एसीएस) ओशिवरामधून कोट्यावधींच्या अमलीपदार्थांसह अटक केली होती. त्यावेळी तुरुंगात असताना त्याची ओळख आरोपी हरिश मंडविलकर याच्याशी झाली आणि त्याच्या मदतीने साजिदने साक्षीदाराला धमकावलं होते. हे प्रकरण उघड झाल्यावर दोघांविरोधात आणखी गुन्हा दाखल करण्यात आला होता.