मुंबई : ‘आभासी कैद’ अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’ची भीता घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. मुंबईत सरासरी ३ दिवसांनी एक ‘डिजिटल अरेस्ट’चा गुन्हा दाखल होत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षातील पहिल्या १० महिन्यांत आभासी कैदचे (डिजिटल अरेस्ट) एकूण १२८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याद्वारे तब्बल १०१ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन याबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

सायबर फसवणुकीतील डिजिटल अरेस्ट हा सर्वाधिक घडणारा गुन्हा आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची भीती घालवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांत मुंबईतील विविध पोलीस ठाणे आणि सायबर शाखेत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचे १२८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजे सरासरी ३ दिवसांत एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा दाखल होत आहे.

ज्येष्ठांच्या घरी जाऊन जनजागृती

सायबर भामटे ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टचे बळी बनवत असल्याचे विविध प्रकरणातून समोर आले आहे. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक सायबर विभागाने २९ अधिकारी आणि ६९ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. सध्या हे पथक विविध भागात जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना अशा फसवणुकीबाबत सावध करीत आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कशी फसवणूक करण्यात येते ते सांगून जनजागृती करीत आहोत, असे पोलीस उपायुक्त (सायबर) पुरूषोत्तम कराड यांनी सांगितले.

पोलिसांचे आवाहन

डिजिटल अरेस्ट नावाची संकल्पना अस्तित्वात नाही, अनोळखी व्हिडियो कॉल्स स्वीकारू नका, त्यांना पैसे पाठवू नका, कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात बदल झाल्यास त्याकडे लक्ष द्या, डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न केल्यास कुटुंबियांना माहिती द्या, असे पोलिसांनी जनजागृती करताना ज्येष्ठ नागरिकांना सांगितले. जर कुणी अशा प्रकारे कॉल करून डिजिटल अरेस्ट करत असल्याचा दावा केला तर तात्काळ स्थानिक पोलिसांना किंवा सायबर पोलिसांच्या मदत क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले.

काय आहे डिजिटल अरेस्ट ?

डिजिटल अरेस्ट हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आहे. यामध्ये सायबर भामटे व्हिडियो कॉल करतात. तुमच्यावर परराज्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगतात किंवा कुठल्यातरी घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे भासवतात आणि डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगतात. विश्वास बसावा म्हणून समोर नकली पोलीस ठाणे दाखवतात. बदनामीपोटी कारवाई टाळण्यासाठी उच्चपदस्थ त्याला बळी पडतात. जे नागरिक या भूलथापांना घाबरतात त्यांच्याकडून तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळले जातात. परंतु प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. परंतु तरीही नागरिक बळी पडत आहेत.