मुंबई : गोरेगाव पत्राचाळीतील १६ पुनर्वसित इमारतीतील ६७२ घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरुवात करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई मंडळाने ताबा प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय मुंहई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी रहिवाशांना वितरण पत्र देण्यात येणार आहेत. तर १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरच्या कालावधीत इमारतींमधील प्रत्येक घराची संबंधित सदनिकाधारकाबरोबर तपासणी करत घराचा ताबा देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. पत्राचाळीतील मूळ ६७२ रहिवाशांसाठीच्या १६ पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करत या इमारतीतील घरांसाठी एप्रिलमध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीनंतर रहिवाशांनी घरांचा ताबा घेणे अपेक्षित होते, मात्र इमारतींचा बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने इमारतीची बांधकामाच्या दर्जाची तपासणी व्हिजेटीआयकडून करण्याचे आदेश मुंबई मंडळाला दिले होते. त्यानुसार व्हिजेटीआयचा अहवाल उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आला.
या अहवालानुसार बांधकामाचा दर्जा निकृष्ट नसल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या अनुषंगाने बुधवारी न्यायालयाने घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मंडळाला दिले. या निर्देशानुसार मुंबई मंडळाने शुक्रवारपासून ताबा प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी वितरण पत्राचे वाटप केले जाईल, तर १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत ताबा पत्र देत घरांचा ताबा दिला जाणार आहे. घराची तपासणी करण्यासाठी तसेच ताबापत्र देण्यासाठी प्रत्येक विंगप्रमाणे मंडळाने वेळापत्रक जाहिर केले आहे. तेव्हा या वेळापत्रकानुसार त्या त्या विंगमधील रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे.