मुंबई : पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चार आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
निलेश शेडगे, सचिन गायकवाड, अभिजीत शिंदे आणि मंगेश आगवणे या चौघांनी जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सोमवारी त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांच्या याचिका फेटाळल्या. न्यायालयाच्या निर्णयाची प्रत रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.
कुख्यात गुंड छोटा राजन याच्या इशाऱ्यावरून डे यांची हत्या करण्यात आली होती. डे यांची त्यांच्या पवई येथील निवासस्थानाजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. डे हे मोटरसायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर फरारी झाले. गोळीबार करणाऱ्या सतीश काल्यासह याचिकाकर्ते घटनास्थळी गेले होते, असा त्यांच्यावर होता, प्रकरणातील आठजणांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप सुनावली होती. त्यात राजन आणि याचिकाकर्त्यांचाही समावेश होता. तर पत्रकार जिग्ना वोरा हिची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती. डे यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात पत्रकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होते. मुंबईतील पत्रकारांनी सरकारकडे अधिक सुरक्षिततेची मागणीही केली होती