मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो मार्गिकेचे काम मुंबई मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले आहे. सध्या सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

याअनुषंगाने आता एमएमआरडीएने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, ३१ ऑक्टोबर रोजी डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईकरांचे डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार अंधेरी पश्चिम – मंडाले दरम्यान ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. २२ किमी लांबीची आणि २२ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानुसार डायमंड गार्डन – मंडाले असा पहिला आणि डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असा या मार्गिकेचा दुसरा टप्पा आहे. या मार्गिकेतील पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन करीत एमएमआरडीएने कामाला वेग दिला होता.

पाच स्थानकांचा समावेश असलेल्या ५.३ किमीच्या टप्प्याचे काम पूर्ण करून काही दिवसांपूर्वीच एमएमआरडीएने या टप्प्याच्या संचलनासाठीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) चाचण्यांना सुरुवात केली. या चाचण्या यशस्वी होऊन सप्टेंबरअखेरीस सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि ८ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचेही लोकार्पण होईल असे वाटत होते. मात्र या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने ८ ऑक्टोबरचा मुहूर्त चुकला आहे. तर आता हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी मुंबईकरांची डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे सांगत आता लोकार्पणासाठी नवीन मुहूर्त दिला आहे.

एमएमआरडीएकडून ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची तयारी सुरू आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हे प्रमाणपत्र प्राप्त होईल. तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, त्यातही ३१ ऑक्टोबरला या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे आमचे नियोजन असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा नवीन मुहूर्त एमएमआरडीए साधणार का आणि मुंबईकरांचे डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार का हे लवकरच स्पष्ट होईल.