मुंबई : आझाद मैदानात पुकारण्यात आलेल्या मराठा आंदोलनात महापालिकेने विविध सोयी – सुविधा पुरविल्या होत्या. दरम्यान, महापालिकेने आंदोलकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी तब्बल १४ लाख लिटर (१ दशलक्ष लिटरहून अधिक) पाण्याचा पुरवठा केला. महानगरपालिका प्रशासनामार्फत पालिकेच्या विभाग ए, बी, ई आणि एफ दक्षिण विभागांमधून सुमारे १०० टँकर्सच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला.
मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात नुकतेच आंदोलन पुकारण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलनकर्ते आझाद मैदानात दाखल झाले होते. या आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात विविध नागरी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. दरम्यान, आंदोलकांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एकूण १२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यांनतर, आंदोलकांची गर्दी लक्षात घेता दुसऱ्या दिवसापासून टँकर्सची संख्या वाढविण्यात आली. २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत एकूण ११० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पाच दिवसांमध्ये टँकर्सच्या साधारण १५७ फेऱ्या झाल्या. त्यातून तब्बल १४ लाख ४० हजार लिटर (१.४४ दशलक्ष लिटर) पाण्याचा पुरवठा करण्यात आला. सर्वाधिक म्हणजेच ७ लाख २० हजार लिटर पाणीपुरवठा पालिकेच्या ए विभागातून करण्यात आला होता. त्यानंतर, ३ लाख २० हजार लिटर पाणी एफ दक्षिण विभागमधून पुरविण्यात आले होते.
दरम्यान, आंदोलकांना महाराष्ट्रभरातून खाण्यापिण्याच्या साहित्याचे शेकडो ट्रक आझाद मैदान परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी आंदोलकांची तहान भागविण्यासाठी अनेक ठिकाणांवरून ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या देखील आंदोलनस्थळी पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेकडूनही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यात आल्याने बाटलीबंद पाण्याचा फारसा वापर झाला नाही. आंदोलनानंतर पाण्याने भरलेल्या हजारो बाटल्या मैदानात शिल्लक होत्या. नतर आंदोलकांनी त्या अनेकांना मोफत वितरित केल्या.
पाणीपुरवठ्याबरोबरच आझाद मैदान आसपासच्या परिसरात स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आणि अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांना शौचालये, पिण्याचे पाणी, तसेच आपत्कालीन आरोग्य सुविधा मिळाल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. महापालिकेने आंदोलनस्थळी वैद्यकीय कक्ष उभारले होते. पाच दिवसांच्या कालावधीत १० हजारांहून अधिक आंदोलकांनी वैद्यकीय सुविधेचा वापर केला.
कोणत्या विभागातून किती पाणीपुरवठा ?
विभाग | पाणीपुरवठा (लिटरमध्ये) |
ए | ७,२०,००० |
बी | २,९०,००० |
ई | १,१०,००० |
एफ दक्षिण | ३,२०,००० |