मुंबई : दिवाळीची चाहुल लागताच मुंबई महापालिकेत बोनसचे वारे वाहू लागले आहेत. विविध कामगार संघटनांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बोनसची मागणी केली आहे. प्रत्येक कामगार संघटनेने बोनसची वेगवेगळी मागणी केली असून जास्तीत जास्त बोनसची मागणी करण्यात कामगार संघटनांमध्येच चढाओढ लागली आहे. बोनसबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या संघटनेला बोलवावे अशी मागणी कामगार संघटनांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. मात्र या बोनसमुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर यंदा २५० कोटी रुपयांहून अधिकचा ताण येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२४ च्या दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये बोनस जाहीर केला होता. २०२३ च्या बोनसपेक्षा तीन हजार रुपये वाढीव बोनस देण्यात आला होता. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खूष करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोनसची घोषणा केली होती.
दरवर्षी बोनसच्या रकमेत साधारणतः पाचशे रुपये वाढ होत होती. मात्र गेल्यावर्षी एकदम तीन हजार रुपयांनी वाढ झाली होती. आता पालिकेची निवडणूक तोंडावर आली असून यंदाही घसघशीत बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण येण्याची शक्यता आहे. गतवर्षी दिवाळीतील बोनसमुळे मुंबई महापालिकेला २५२ कोटी रुपये खर्च आला होता. यंदा हा खर्च आणखी वाढणार आहे.
अभियंत्यांची ५० टक्के बोनसची मागणी
मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे पाच हजार अभियंत्याची आस्थापना पदे आहेत. परंतु आजघडीला सुमारे १५०० अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्यांवर सेवेचा अतिरिक्त ताण येत आहे. इतर संवर्गापेक्षा अभियंता संवर्गाला काकणभर जास्त सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने विचार करावा. अभियंता, अधिकारी या संवर्गाला एकूण वार्षिक वित्तलब्धीच्या किमान ५० टक्के सानुग्रह अनुदान (बोनस) म्हणून देण्यात यावा, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी केली आहे.
कामगार संघटनेची २० टक्के बोनसची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कायम कामगार, कर्मचारी, अधिकारी, निरिक्षकीय कर्मचारी, सुरक्षा दल कर्मचारी, आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, सर्व कंत्राटी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरसीएच २ मधील कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी, एनयुएचएम / डी.एस. ऐंटरप्रायझेसमार्फत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागात कार्यरत असणारे कर्मचारी, तसेच बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या एकूण वित्तलब्धीच्या २० टक्के रक्कम बोनस / सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.
कामगार सेनेची २५ टक्के अधिक रकमेची मागणी
महापलिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपासून निम्न स्तरीय कामगारांपर्यंत काम करणाऱ्या कामगार, कमचाऱ्यांना गेल्यावर्षी देण्यात आलेल्या रकमेपेक्षा २५ टक्के अधिक रक्कम बोनस म्हणून द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. तर म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सरसकट सर्व कामगारांना ५० हजार रुपये बोनसची मागणी केली आहे.