मुंबई : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्व गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी – कामगारांनी उत्सवाच्या खरेदीसाठी मासिक वेतन १ सप्टेंबरऐवजी २३ ऑगस्ट रोजी करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

गणेश उत्सवाच्या तयारीसाठी बाजारात गर्दी होत असून महापालिकेतील कामगारांनीही उत्सवासाठी खरेदी सुरू केली आहे. पालिकेतील बहुतांश कामगार – कर्मचारी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या गावी जातात. महानगरपालिकेतील कामगारांचा महिन्याच्या १ तारखेला पगार होतो. त्यामुळे खरेदी व उत्सवाच्या अन्य तयारीचा विचार करून १ सप्टेंबरऐवजी २३ ऑगस्ट रोजी पगार द्यावा, अशी मागणी द म्युनिसिपल युनियनने केली आहे.

यापूर्वी अनेक वेळा सण – उत्सवांच्या कालावधीत कामगार – कर्मचाऱ्यांवर येणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने १ तारखेपूर्वी पगार दिला आहे. त्यामुळे यावेळीही कामगारांची मागणी मान्य केली जाईल, असा विश्वास द म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी व्यक्त केला.