मुंबई : यावर्षी गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त प्रभादेवी नाक्यावर कोणत्याही राजकीय पक्षाला स्वागत मंडप उभारण्यास परवानगी द्यायची नाही, असा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानंतर वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार झाला होता. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव यंदा कोणत्याही राजकीय पक्षाला प्रभादेवी नाक्यावर मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दादर – प्रभादेवी परिसरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच प्रभादेवी जंक्शन परिसरात कोणत्याही राजकीय पक्षांना मंडप उभारण्याची पवानगी न देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. सर्व पक्षांना प्रभादेवी परिसरात मंडपासाठी पर्यायी जागा शोधण्यास सांगण्यात आले आहे. केवळ प्रभादेवी नाक्यावर यावर्षी कोणत्याही राजकीय पक्षांना स्वागत मंडप उभारण्यास परवानगी न देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तसेच इतर ठिकाणीही राजकीय पक्षांचे मंडप एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : प्लास्टिकच्या बाटल्या काढताना नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू

गेल्यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवी चौकात एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे स्वागत मंडप एकमेकांसमोर उभारण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना नागोसयाजीची वाडी येथील शाखेसमोर ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत व इतर कार्यकर्त्यांनी गाठले. त्यावेळी तेलवणे यांना मारहाण करण्यात आली. त्यातून हा वाद सुरू झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ११ सप्टेंबर रोजी दोन्ही गट दादर पोलीस ठाण्यात एकमेकांसमोर आले होते.

हेही वाचा : “इतिहासजमा”, डबल डेकर बसच्या अखेरच्या दिवशी सेलिब्रिटी भावुक; म्हणाले, “मुंबईकरांसाठी ही बस नाही तर…”

त्यावेळी शिंदे गटाकडून पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. तक्रारीनुसार, सरवणकरांचा एक कार्यकर्ता मोटरगाडीतून बंदूक घेऊन आला होता. त्यावेळी त्यातून गोळी झाडण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक बाबासाहेब साळुंके यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर, त्यांचा मुलगा व माजी नगरसेवक समाधान सरवणकर, संतोष तेलवणे, कुणाल वाडेकर व इतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दादरमध्ये पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली होती. पुढे न्यायावैधक चाचणीत आमदार सदा सरवणकर यांच्या परवानाधारक शस्त्रातून गोळी सुटक्याचे निष्पन्न झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police denied permission to political parties for mandap at prabhadevi naka for ganesh visarjan due to last year clashes between workers of shinde and thackrey faction mumbai print news css
First published on: 15-09-2023 at 16:49 IST