मुंबई : रेल्वे पोलिसांनी खंडणी घेतल्याप्रकरणी प्रमुख आरोपी निलंबित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया इंगवलेसह दोघांच्या पोलीस कोठडीत १५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसानी आरोपींकडून आतापर्यंत साडेचार लाख रुपये जप्त केले आहेत. वांद्रे स्थानकात रेल्वे पोलिसांच्या टोळीने तपासणीच्या नावाखाली एका प्रवाशाकडून १० लाख रुपये खंडणी स्वरूपात उकळले होते.
इंगवले आणि काळुस्कर मास्टरमाईंड
२ सप्टेंबर रोजी वांद्रे स्थानकात व्यावसायिक विकास गुप्ताची बॅग तपासणीच्या नावाखाली लूट करण्यात आली होती. त्यावेळी निलंबित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया इंगवले ही घटनास्थळावर उपस्थित होती. याबाबत माहिती देताना रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंगवले आणि कळसुलकर या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. आरोपींकडून अद्याप ६ लाख रुपये जप्त करणे बाकी आहे. हे दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात होते. काळसुलकर हा सराईत गुन्हेगार आहे. तो इंगवलेच्या संपर्कात आला आणि या खंडणी प्रकरणाला सुरूवात झाली. या प्रकरणातील अन्य आरोपी झहीर अहमद, शुभम ओगानिया, बाब आणि खानसाब अद्याप फरार आहेत. आरोपींच्या पोलीस कोठडीत १५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. इंगवले तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
प्रकरण काय?
मालाड येथील रहिवासी विकास गुप्ता हे कपड्याचे व्यावसायिक आहेत. कपड्यांची खरेदी करण्यासाठी ते गुजरातला रवाना होत होते. यावेळी गुजरातला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी ते वांद्रे टर्मिनस येथे गेले. वांद्रे टर्मिनस येथील रेल्वे उपाहारगृहाजवळ उभे राहिले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून, कुठे जात आहेत, बॅगेत काय आहे, अशी विचारणा केली.अनोळखी व्यक्तींनी बॅगेची पाहणी केली असता, त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याबाबत गुप्ता यांच्याकडे विचारणा केली. तसेच रोख रक्कम गुप्ता यांचीच आहे, त्याचा पुरावा दाखविण्यास सांगितले. परंतु, त्यावेळी कोणताही पुरावा नसल्याने गुप्ता घाबरून गेले.
अनोळखी व्यक्तींनी रोख रक्कम घेऊन पुन्हा मिळणार नसल्याचे सांगितले. काही वेळानंतर गुप्ता यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी १० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवली. रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
१३ पोलीस निलंबित, ४ पोलिसांवर गुन्हे
अनेक रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांकडूनच प्रवाशांची लूट होत असल्याच्या घटना घडल्याचे समोर आले. पोलीस आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून प्रवाशांच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी ४ पोलिसांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५ सप्टेंबर रोजी ८ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत मुख्यालयात बदली करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या १६ वर गेली आहे. अशा घटना रोखण्यासाठी बॅगा तपासण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहे. केवळ गणवेात आणि सीसीटीव्ही कॅमेरा असतील अशा ठिकाणीच बॅगा तपासाव्यात, खोलीत किंवा एकांतात बॅगा तपासण्यास मनाई करण्यात आली आहे.