मुंबई : मुंबईत शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. त्यातही पश्चिम उपनगरात जास्त पाऊस पडत असून गेल्या चार तासांत जोगेश्वरी परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जोगेश्वरीत सकाळी ८ पासून तीन तासांत सर्वाधिक ६७ मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात घाटकोपर परिसरात सर्वाधिक पाऊस पडला.

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून कामावर जायला निघालेल्या नोकरदारांचे त्यामुळे हाल झाले. हवामान विभागाने गुरुवारपासून पावसाचा इशारा दिला होता. मात्र गुरुवारी मुंबईत फारसा पाऊस पडला नाही. परंतु, शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस पडू लागला आहे. पावसाचे पाणी साचल्याची नोंद झालेली नसली तरी अंधेरी सब वेमध्ये मात्र पाणी साचल्यामुळे सकाळपासून दोन वेळा सब वे बंद करावा लागला.

आज मोठी भरती

गुरुवारपासून सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारी पाऊण वाजता मोठी भरती येणार असून यावेळी ४.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे. त्याचवेळी जर पावसाचा जोर वाढला तर मुंबईत काही ठिकाणी पाणी साचू शकते.

अंधेरी सब वे सकाळपासून दोन वेळा बंद

पावसाचा जोर अंधेरी, जोगेश्वरी परिसरात जास्त असल्यामुळे अंधेरी सब वेमध्ये वारंवार पाणी साचत होते. त्यामुळे सकाळपासून दोन वेळा अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता. यावेळी वाहतूक गोखले पुलावरून सोडण्यात आली होती. पाण्याचा निचरा झाल्यानंतर सब वे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

सकाळी ८ ते ११ दरम्यानचा पाऊस

पश्चिम उपनगरे

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी : ६७.३ मिमी

– मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी : ६६.६ मिमी

– नारियलवाडी महानगरपालिका शाळा, सांताक्रुझ : ६५.४ मिमी

– अंधेरी पूर्व विभाग (वॉर्ड) कार्यालय : ६५.२ मिमी

पूर्व उपनगरे

– घाटकोपर एन विभाग (वॉर्ड) कार्यालय : ५८.८ मिमी

– टेंबीपाडा महानगरपालिका शाळा, भांडुप : ५७.८ मिमी

– रमाबाई महानगरपालिका शाळा, घाटकोपर : ५३.४ मिमी

– पासपोली पवई महानगरपालिका शाळा, पवई : ५२.६ मिमी

-बांधकाम प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी (पूर्व) : ५१.८ मिमी

शहर

– प्रतिक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) – ३०.२ मिमी

– रावळी कॅम्प : २२.३५ मिमी