Mumbai Rain Today : मुंबईकरांनी आज सायंकाळपासून सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात गडगडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पूर्वेकडून येणाऱ्या ढगांमुळे, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोसमी वारे वाटचाल करतील. या कालावधीत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारपासून राज्यात पाऊस सुरू होईल असे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवले होते. त्यानुसार गुरुवारी मुंबईसह राज्यातील इतर भागात पाऊस पडला. मुंबईत प्रामुख्याने गुरुवारी मध्यरात्री पावासाचा जोर अधिक होता. दादर, परळ, वरळी, प्रभादेवी या परिसरात साधारण एक तास पाऊस कोसळत होता. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. तसेच ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. शक्यतो मुंबईत पावसाचा जोर हा सायंकाळनंतर राहील. त्यानंतर मध्यरात्रीही पावासाचा जोर कायम राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबरोबरच कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत मध्यरात्री झालेला पाऊस (मिमी मध्ये)

वरळी- ४४ मिमी

दादर-३९ मिमी

माटुंगा -३७ मिमी

मलबार हिल – ३० मिमी

मुंबई सेंट्रल – २६ मिमी

परळ-२९ मिमी

रत्नागिरीला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट)इशारा

रत्नागिरी जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भात मोसमी वाऱ्यांची वाटचाल शक्य

बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक वातावरण असल्याने विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांच्या काही भागात मोसमी वाऱ्यांची वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नैकृत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागांतील २६ मे रोजी वाटचाल केल्यानंतर मोसमी वाऱ्याचा प्रवास मंदावला होता. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारीही एकाच जागी होती.