मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘मीठ – साखर अभियान २०२५’ जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियांनार्तगत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील फक्त २७ टक्के नागरिकांना साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम माहीत असल्याचे उघडकीस आले. मुंबईसारख्या महानगरामध्ये नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अंदाजानुसार, भारतामध्ये सुमारे १ लाख २८ हजार ५०० बालक आणि किशोरवयीन मुले टाइप १ मधुमेहाने प्रभावित आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३ पैकी १ एक व्यक्ती असंसर्ग आजाराने पीडित असतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामागील मुख्य कारण म्हणजे नागरीकरण, बसून राहण्याची जीवनशैली, अयोग्य आहाराच्या सवयी इत्यादी आहे. तसेच मुंबईमध्ये एकूण १५.६ टक्के मधुमेहपूर्व व्यक्ती आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या दवाखाना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये १ लाख २० हजार रुग्ण मधुमेहावर उपचार घेत आहेत.

२६ रुग्णालयांमध्ये विशेष रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. यात ३० वर्षांवरील व्यक्तींचे मधुमेह आणि रक्तदाबासाठी सर्वेक्षण केले जाते. ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत ५ लाख ५९ हजार ७५१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आजवर १ लाख ५९ हजारांहून अधिक मधुमेही रुग्णांना सल्ला देण्यात आला आहे.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास नागरिकांच्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडेल. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘हेल्दी कॅम्पस अभियाना’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.

महाविद्यालयांमध्ये करणार जनजागृती

‘हेल्दी कॅम्पस उपक्रम’ ‘मीठ-साखर अभियान’ म्हणून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईतील सुमारे १०० हून आधिक महाविद्यालयांमध्ये ‘हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा’ या घोषवाक्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय छात्र सेवा’ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत ‘हेल्दी फूड फेस्ट’ स्पर्धा आणि डिजिटल मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. आहार तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना पोषण दूत म्हणून प्रशिक्षित केले जाईल. तसेच स्वयंपाकी, पाककला तज्ज्ञ आणि महिला स्वयंसेविका व समुदाय प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कमी मीठ – साखरयुक्त पाककृती, आरोग्यदायी खाद्यपदार्थ विकसित करून समाजात आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.