मुंबई : मतदार याद्यांमधील घोळाबाबत वारंवार तक्रारी करूनही निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करते. कितीही पुरावे दिले तरी त्याची दखलच घेतली जात नाही आणि थातूरमातूर खुलासे केले जातात. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. निवडणूक आयोग अशांना रोखणार नसल्यास दुबार नावे असलेले मतदार मतदानाला आल्यास त्यांना फोडून काढा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर या वेळी टीका केली. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांना फोडून व बदडून काढण्याचा आदेशच मनसेच्या कायर्कर्त्यांना दिला. तर ‘मतचोरांना लोकशाही मार्गाने फटकावून काढण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात १३० मतदारांची नोंदणी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. निवडणूक आयोगाचे काय चालले, हेच समजत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सदोष याद्या आणि मतचोरी करून निवडणुका घेणार असाल तर निवडणुका घ्यायच्या की नाहीत, हे जनतेने ठरवावे. अशा निवडणुका न लढविलेल्या बऱ्या, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी मांडली.

निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेत किती विलंब लागतो हे शिवसेनेच्या फुटीवरील याचिकेवरून अनुभवास आले. यामुळे जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल. – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख (ठाकरे गट)

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण : शरद पवार

‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीसारखा इतिहास निर्माण करणारा आजचा मोर्चा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही असेच लाखोंचे मोर्चे निघत होते.याची आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वेळी करून दिली. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार आणि लोकशाही वाचविण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या. पडेल ती किंमत मोजू, पण मताचा अधिकार आणि लोकशाही टिकवू,’ असा निर्धार पवार यांनी केला.

शिरसाट, मुश्रीफांचा विरोधकांच्या सुरात सूर

महाविकास आघाडीचे नेते मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगावर आरोप करीत असताना महायुती सरकारमधील संजय शिरसाट आणि हसन मुश्रीफ या दोन मंत्र्यांनीही मतदार याद्यांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता व्यक्त करीत विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. मतदार याद्यांमध्ये काही चुका वा गोंधळ असल्यास त्यात दुरुस्ती झाली पाहिजे, अशी भूमिका शिरसाट आणि मुश्रीफ यांनी मांडली.