IMD Forecast Mumbai no Rainfall: मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईत पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार नसला तरी संततधार पाऊस सुरू होता. त्यानंतर रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, मुंबईत शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता फारशी नसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईत पावसाची उघडीप राहील. पूर्व विदर्भात आज विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर भागात पावसाचा अंदाज नाही.

वायव्य भारतातील वादळी प्रणालीमुळे कोकण तसेच घाटमाथ्यावर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, उर्वरित भागात पावसाची फारशी शक्यता नाही. मुंबईतही हीच स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज नाही. मुंबईत पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील. तसेच दिवसा पश्चिमेकडून वारे वाहतील त्यामुळे दिवसाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मात्र, आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागेल. त्यानंतर साधारण १३ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे.

वादळी प्रणाली

आग्नेय पाकिस्तान, राजस्थान आणि कच्छ परिसरावर वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. ही प्रणाली पाकिस्तानातील छोरपासून ९० किलोमीटर आग्नेयेकडे, राजस्थानच्या बारमेरपासून १२० किलोमीटर नैऋत्येकडे, जैसलमेरपासून १९० किलोमीटर पश्चिमेकडे, गुजरातच्या राधांपूरपासून १७० किलोमीटर वायव्येकडे, तसेच भूजपासून २१० किलोमीटर उत्तरेकडे होती. या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा वादळी प्रणालीपासून कोटा, ओराई, सिधी, रांची, दिघा, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यातील पावसाची स्थिती

राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकण आणि घाटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर ओसरला आहे. पूर्व विदर्भात आज विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर भागात मात्र पावसाची उघडीप राहील. अधूनमधून हलक्या सरी बरसतील.

सप्टेंबरमध्ये १०९ टक्के पाऊस

सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्य, पूर्व भारताचा काही भाग, दक्षिण द्वीपकल्पाचा बहुतांश भाग आणि देशाच्या उत्तरेत असलेल्या जम्मू- काश्मीर, लडाख वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

ला-निना स्थिती

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण स्थिती (एन्सो न्यूट्रल) आहे. मान्सून हंगाम अखेरच्या टप्प्यात येताच प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून आणि हिवाळ्यात ‘ला-निना’चा प्रभाव राहू शकेल. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण पातळीवर असून, मान्सून अखेरीस ‘आयओडी’ ऋण (निगेटिव्ह) होण्याचा अंदाज आहे.