मुंबई : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील गलगोटियास विद्यापीठात १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघाची निवड करण्यात आली आहे. मेडिकॅप विद्यापीठ इंदूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरला.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेच्या संघात ओमकार येनपुरे, दिनेश यादव, शंकर साळुंखे, क्षितिज ठोंबरे, राज आचार्य, प्रतीक जाधव, करण भगत, निलेश शिंदे, जयेश गावंड, नीरज मिसाळ, रुतिक पाटील, मनिक राठोड, साई चौगुले, दिनेश करून या खेळाडूंचा सहभाग आहे.
या संघासाठी प्रशिक्षक म्हणून विद्यापीठाचे माजी खेळाडू व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे आणि संघव्यवस्थापक म्हणून रामसागर पांडे काम पाहत आहेत. या संघाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. मनोज रेड्डी आदींनी शुभेच्छा दिल्या.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील मेडिकॅप विद्यापीठात १ ते ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने एम. एस. बडोदा विद्यापीठाचा (३५/३४) एका गुणाने पराभव केला, व्ही. एन. सूरत विद्यापीठाचा (३२/१७) १५ गुणांनी पराभव केला, त्यानंतर पुढील सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (३५/२९) सहा गुणांनी पराभव केला आणि उप उपांत्य फेरीत जयपूरमधील झुंझुनु विद्यापीठाचा (३६/१९) १७ गुणांनी पराभव करीत उत्कृष्ट कामगिरी केली होती.