Three Language Formula मुंबई : पहिलीपासून त्रिभाषा सूत्र देशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोनच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे, असे प्रतिपादन राज्य सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले आहे. त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचे की कोणत्या इयत्तेपासून करायचे, याबाबत समिती राज्यभरातील जनतेचा कौल ऑनलाइन पद्धतीसह विविध माध्यमांतून अजमावणार असून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच राज्यातील आठ शहरांमध्ये जनतेसह विविध संस्था-संघटनांशी चर्चाही करणार आहे.
राज्यात त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करण्याच्या शासन निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला. तर भाजप नेत्यांनी शासननिर्णयाचे समर्थन केले होते. देशातील १७-१८ राज्यांमध्ये पहिलीपासून हे सूत्र लागू असल्याचा आणि राज्यातील विद्यार्थी अन्य राज्यांच्या तुलनेत क्रेडिट सिस्टीममध्ये मागे पडत असल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. देशातील चार-पाच राज्यांमध्ये तिसरीपासून तर चार-पाच राज्यांमध्ये सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू असल्याची प्राथमिक माहिती आहे. देशातील अन्य राज्यांमधून त्रिभाषा सूत्राबाबतचा तपशील समितीने मागविला असल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.
मराठी भाषेसंदर्भात कार्य करणाऱ्या राज्यभरातील संस्थांसह पालक व शिक्षक संघटना, राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदींना पत्र पाठवून त्यांची निवेदने व मते मागविली जाणार आहेत. सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांकडूनही मते मागविली जातील. त्याचबरोबर समिती आठ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर या आठ शहरांमध्ये जाणार असून दिवसभर तेथील संस्था, संघटना व नागरिकांचा कौल अजमावणार आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत शासनाने दिली असून ती पाच डिसेंबरपर्यंत आहे.
जनमत अजमावणार
जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक बुधवारी मंत्रालयात झाली. तेव्हा समितीने कशा पद्धतीने कामकाज करावे, याबाबत निर्णय घेण्यात आले. त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून लागू करायचे, याबाबत विविध मार्गांनी जनमताचा कौल अजमावला जाणार आहे. समितीचे संकेतस्थळ १५ दिवसांत विकसित करण्यात येणार असून त्यावर सर्वसामान्य जनतेसाठी बहुपर्यायी पद्धतीने प्रश्नावली देण्यात येईल. त्रिभाषा सूत्रावर मतप्रदर्शन केलेल्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी जाधव यांच्याकडून घेण्यात येणार आहेत.