राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज कारवाईवरून एनसीबीवर गंभीर आरोप केलेत. एनसीबीने भाजप नेत्यांच्या फोनवरून ताब्या घेण्यात आलेल्या काही लोकांना सोडून दिलं, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय. त्यावर पत्रकारांनी एनसीबीला महाराष्ट्र सरकारच्या चौकशी आयोगाच्या प्रश्नांना उत्तरं देणार का? आणि मुंबई पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपाच्या चौकशीसाठी तुमचे फोन मागितले तर तुम्ही फोन जमा करणार का? असे प्रश्न विचारले. यावर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी न्यायालय जो आदेश देईल त्याचं आम्ही पालन करू, असं उत्तर दिलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीर वानखेडे म्हणाले, “आमची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी न्यायालय आम्हाला जो आदेश देईल त्याचं आम्ही पालन करू. आम्ही ११ नव्हे तर १४ लोकांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आणलं होतं. त्यांना त्याबाबत नोटीसही देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर ८ लोकांना अटक करण्यात आले. आम्ही निष्पक्ष संस्था आहोत. कोणताही पक्ष, जात यावरून भेदभाव करत नाही. जे कायदा सांगतो ते आम्ही करतो.”

“एनसीबीवर करण्यात आलेले सर्व आरोप विनाधार आणि पूर्वग्रहदुषित आहेत. अनेक विधानं ही केवळ गृहितकांवर आधारित आहेत. एनसीबीची कारवाई आणि त्यासाठीच्या प्रक्रिया या कायद्याला धरुन आणि पारदर्शक आहेत आणि असतील,” असंही एनसीबीने म्हटलं आहे.

“कारवाईपूर्वी ९ साक्षीदारांपैकी एनसीबी कुणालाही ओळखत नव्हती”

“एकूण ९ स्वतंत्र साक्षीदार या कारवाईत आहेत. मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी हे त्यापैकीच आहेत. या कारवाईआधी एनसीबी वरील दोन साक्षीदारांसह ९ जणांना ओळखत नव्हती. हायप्रोफाईल व्यक्तींना अटक झाल्यानं या प्रकरणातील कोणतीही माहिती बाहेर लिक होऊ नये यासाठी संबंधित आरोपींना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. याबाबत न्यायालयातही माहिती देण्यात आलीय. आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आलीय. सर्वांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलीय. सखोल चौकशीनंतर यापैकी ८ जणांना अटक करण्यात आले आणि इतरांना सोडून देण्यात आले,” अशी माहिती एनसीबीने दिली.

एनसीबी म्हणाली, “या प्रकरणात घटनास्थळावर पंचनामा देखील केला. तो न्यायालयात सादर केला जाईल. अटक करण्यात आलेल्या ८ जणांना न्यायालयाने कोठडी दिलीय. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.”

एनसीबी नेमकं काय म्हणाली?

एनसीबीला आपल्या कारवाईत दोन साक्षीदारांचाही समावेश करावा लागतो. या साक्षीदारांची माहिती मिळवणं आणि तपासणी करणं अवघड असतं. कारण त्यावेळ आमचा प्रमुख उद्देश ड्रग्ज जप्त करणं आणि कारवाई करण्यावर असतो. या कारवाईत एकूण ९ साक्षीदार सहभागी झाले. यात मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी यांचाही समावेश होता. २ ऑक्टोबरच्या कारवाईआधी या सर्व साक्षीदारांना एनसीबी ओळखत नव्हती.

या कारवाईत ज्यांना अटक केली त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यांची चौकशी करताना सर्वांसोबत न्यायसंगत वर्तन करण्यात आलं. त्यांच्या वकिलांनी देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर याबाबत विश्वास व्यक्त केलाय. त्याची न्यायालयातही नोंद आहे.

नवाब मलिक यांचे नेमके आरोप काय?

नवाब मलिक म्हणाले होते, “एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव सुनावणीदरम्यान आलं आहे.”

“भाजपच्या नेत्यांनी एनसीबीला ११ पैकी ३ जणांना सोडून देण्याचे आदेश दिले”

“या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.”

“सोडून देण्यात आलेल्यांपैकी एकजण भाजपा पदाधिकाऱ्याचा मेहुणा”

या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचं नाव जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.

“आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb sameer wankhede comment on political interference and inquiry by maharashtra government pbs