मुंबई : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरच रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे समजते. दुसरीकडे, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून कोणताही वाद नाही, असा निर्वाळा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी सोमवारी दिला असला तरी यातून महायुतीत धुसफुस समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची तात्काळ दखल घेत रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यामागे दिल्लीचा हस्तक्षेप कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यापू्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठविण्यात आली होती. मुख्यमंत्र्‍यांनी पाठविलेल्या यादीला दिल्लीतील भाजप नेतृत्वाने मान्यता दिली होती. रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी शिंदे गट आग्रही होता.

हेही वाचा : पाच पोलिसांमुळेच आरोपीचा मृत्यू, बदलापूरप्रकरणी चौकशी अहवालातील निष्कर्ष

आमदारांच्या फाटाफुटीची चर्चा

दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस २४ तासांत स्थगिती देण्यात आल्याने शिंदे गट खुशीत असतानाच दिवसभर शिंदे गटाचे काही आमदार फुटणार अशी चर्चा सुरू झाली. शिंदे गटाचे २० आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पसरण्यामागे पालकमंत्र्यांच्या स्थगितीचा काही संबंध आहे का, अशी शंका घेतली जाऊ लागली. शिंदे यांना शह देण्याकरिताच भाजपने ही चर्चा सुरू केल्याचे बोलले जाऊ लागले.

कोंडीमुळे अस्वस्थता

गेल्या महिनाभरात भाजपकडून सातत्याने शिंदे यांची कोंडी केली जात असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता होती. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून शिंदे यांना धक्का देण्यात आला. यामुळेच नाराज झालेल्या शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यातूनच दावोसला दाखल होताच रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आली. रविवारी सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरा स्थगितीचा शासकीय आदेश जारी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी व भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली ही बाब अधिक गंभीर मानली जाते.

हेही वाचा : शिवसेना ठाकरे गटाचा फलक पालिकेने काढला; सायन प्रतीक्षा नगर मधील घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक

संजय शिरसाट यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरून करण्यात आलेली उचलबांगडी, एस. टी. बसेस खरेदीची निविदा रद्द करणे याशिवाय अन्य काही निर्णयांमुळे शिंदे अस्वस्थ होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा

रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असली तरी महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री दावोसहून परतल्यावर चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे शिंदे व पवार यांनी म्हटले आहे.

कोकणात कोणत्याच जिल्ह्यात राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळाले नव्हते. यातूनच रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील कुंभमेळाच्या नियोजनासाठीच गिरीश महाजन यांच्याकडेच पालकमंत्रीपद कायम ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : समीर वानखेडे यांच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात बदनामीची तक्रार; न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश

झेंडावंदन महाजन, तटकरेच करणार

पालकमंत्रीपदावर झालेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असली तरी २६ जानेवारीला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्याच हस्ते झेंडावंदन होईल, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. बीडची कन्या असल्याने बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर चांगले झाले असते, अशी भावना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पंकजा यांच्याकडे जालन्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New delhi bjp stay on appointment of guardian minister of nashik raigad due to eknath shinde s displeasure css