मुंबई : सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाच्या विस्तारीकरणाअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वाकोला नाला – पानबाई शाळा दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात आला आहे. या उन्नत रस्त्याचे लोकार्पण १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले. मात्र लोकरपणानंतर आठवड्याभरातच हा रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्याची नामुष्की एमएमआरडीवर ओढावली आहे. या उन्हात रस्त्यावरील गतिरोधक काही दिवसातच उखडल्याने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या दोन तासाच्या कालावधीसाठी उन्नत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गतिरोधकांची दुरुस्ती झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
पश्चिम द्रुतगती ते पूर्व द्रुतगती महामार्ग प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुज – चेंबूर जोडरस्ता बांधला. पुढे या जोडरस्त्यावरून वांद्रे – कुर्ला संकुल आणि वाकोला येथे पोहोचणे सोपे व्हावे यासाठी ६०० कोटी रुपये खर्च करून सांताक्रुझ- चेंबूर रोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला. या विस्तारीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्ता प्रकल्प. १.०२ किमी लांबीच्या या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उन्नत रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यामुळे अमर महल जंक्शन ते वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास केवळ ३५ मिनिटांत करणे शक्य झाले. मात्र लोकार्पणानंतर अवघ्या आठ दिवसांतच हा रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्याची वेळ आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नत रस्त्यावरील उखडलेल्या गतिरोधकांची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यानुसार शनिवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत गतिरोधकांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी दोन तास उन्नत रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. या दोन तासांच्या कालावधीत वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. तर दुरुस्तीनंतर हा रस्ता सायंकाळी ६ वाजता पुन्हा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. लोकार्पणानंतर आठ दिवसांतच रस्ता नादुरुस्त झाल्याने एमएमआरडीवर टीका होत आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
कंत्राटदार जे. कुमारला १० लाख रुपये दंड
पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्त्यावरील गतिरोधक उकडल्याने एमएमआरडीएने कंत्राटदार जे. कुमारला १० लाख रुपये दंड ठोठावल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर सल्लागार कंपनी पॅडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडलाही हलगर्जीपणाबद्दल एक लाख रुपये दंड करण्यात आला आहे. दरम्यान जे. कुमार कंपनीकडे एमएमआरडीएसह अन्य काही यंत्रणांचे अनेक प्रकल्प आहेत. बऱ्याच प्रकल्पात या कंपनीकडून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन कंपनीविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) साडेपाच कोटी रुपयांहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे.
‘मेट्रो २ ब’ (अंधेरी पश्चिम – मंडाले) मार्गिकेतील पियर आणि पियर कॅप्सच्या उभारणीचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘एमएमआरडीए’ने या कंपनीला ४६ लाख रुपये दंड ठोठावला होता. तर ‘दहिसर – मिरा – भाईंदर मेट्रो – ९’ मार्गिकेवर झालेल्या एका मोठ्या अपघाताप्रकरणीही एमएमआरडीएने या कंपनीला ३० लाख रुपये दंड केला होता. तर ‘मेट्रो-३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याची चाचणी सुरू असताना मार्गिकेत पाणी शिरल्याप्रकरणी ‘एमएमआरसी’ने या कंपनीला दोन कोटी रुपये दंड ठोठवला होता. आतापर्यंत या कंपनीला सुमारे साडेपाच कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात आता आणखी १० लाख रुपयांची भर पडली आहे. दरम्यान, जे. कुमारकडून सातत्याने प्रकल्पात निष्काळजीपणा केला जात आहे, त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.