मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ रहिवाशांपैकी प्रातिनिधिक १६ रहिवाशांना १४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. चावी वाटप सोहळा झाला, पण प्रत्यक्ष घराचा ताबा वा घराची खरीखुरी चावी रहिवाशांना देण्यात आली नव्हती. गणेशोत्सवापूर्वी नव्या घरात जाण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र सोहळ्यानंतर सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने आणि त्यानंतर दोन दिवस पावसात गेल्याने प्रत्यक्ष ताबा रखडला होता.

अखेर बुधवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रकल्प स्थळी जाऊन हमी पत्र घेत चावी देण्याच्या, घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत १८ रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत ताबा प्रक्रिया सुरु ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार रात्री उशीरापर्यंत ताबा प्रक्रिया सुरु होती.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १३ पुनर्वसित इमारतींपैकी दोन पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण झाल्याने त्यातील ५५६ घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १४ आॅगस्टला ५५६ रहिवाशांपैकी १६ रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात चावी वाटप करण्यात आले. एकूण रहिवाशांपैकी ४५० हून अधिक रहिवासी मंडळाच्या संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. त्यात अंदाजे ८० रहिवाशांनी नियम मोडून संक्रमण शिबिरातील घरे भाड्याने दिल्याचे मंडळाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. त्यामुळे मंडळाने संक्रमण शिबिरातील सर्वच रहिवाशांना हमीपत्र सादर करणे बंधनकारक केले.

जेणेकरुन संक्रमण शिबिरातील गाळे योग्य प्रकारे रिकामे होतील. मंडळाच्या या निर्णयानुसार चावी वाटप सोहळ्यानंतर तीन दिवसांनी अर्थात सोमवारपासून हमीपत्र घेत प्रत्यक्ष घराचा ताबा, चावी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सोमवार, मंगळवार मुंबईत मुसळधार पाऊस होता. त्यामुळे ताबा देणे मंडळाला शक्य झाले नाही. पण बुधवारी मात्र पावसाने उघडीप देताच मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी जाऊन ताबा देण्यास सुरुवात केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १३५ रहिवाशांना वितरण पत्र वितरीत करण्यात आले, तर १८ जणांनी घराची चावी घेतल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी ६ वाजेपर्यंतही काही रहिवासी प्रकल्पस्थळी आले होते. जितके रहिवासी आले होते त्यांना ताबा देण्याचे काम सुरु ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार रात्री उशीरापर्यंत ताबा देण्याचे काम सुरु होते.

गणेशोत्सव नव्या घरात…

चाळीतील घर सर्वात आधी रिकामे करणाऱ्या कृष्णाबाई काळे यांनी बुधवारी चावी घेतली. यावेळी त्यांचे कुटुंब खूप आनंदात होते. गणेशोत्सव नव्या घरात साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी दुसरीकडे उर्वरित रहिवाशांपैकी अनेकांना गणेशोत्सव नवीन घरात साजरा करायचा आहे. मात्र ताबा घेण्यास वेळ लागणार असल्याने ते काहीसे नाराज आहेत. मंडळाने मात्र रहिवाशांनी हमीपत्र घेऊन यावे आम्ही शक्य तितक्या लवकर ताबा देऊ असे स्पष्ट केले आहे. ताबा घेतल्यानंतरही तात्काळ नवीन घरी राहण्यास जाणे शक्य नसल्याचे सांगून काही रहिवाशांनी घराचा ताबा किमान महिनाभर आधी मिळणे आवश्यक होते असेही सांगितले.