मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटन या दोन देशांमधील वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधार ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. भारत आणि ब्रिटन नैसर्गिक मित्र तसेच भागीदार आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य या समान मूल्यांवरच आमची मैत्री अधिक दृढ झाली, असेही मोदी या वेळी म्हणाले.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनात मोदी यांनी, पंतप्रधान स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचा आवर्जून उल्लेख केला. ‘गेल्या जुलैमध्ये माझ्या ब्रिटन दौऱ्यात ऐतिहासिक अशा आर्थिक आणि व्यापार करारांवर सहमती झाली. या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, व्यापार वाढेल तसेच उभय राष्ट्रांंमधील उद्योग आणि ग्राहकांना त्याचा लाभ होईल,’ असे मोदी यांनी सांगितले.
गेल्या वर्षी भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाचा प्रारंभ केला. या अंतर्गत तंत्रज्ञानामध्ये संयुक्त संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपकमांसाठी एक मंच तयार केला आहे. दोन्ही देशांतील युवा पिढीला जोडण्यासाठी संपर्क जोडणी आणि नावीन्य केंद्र, संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र यांसारखी अनेक पावले उचलली आहेत. भारत आणि ब्रिटन दरम्यान तंत्रज्ञान विषयक भागीदारीत अमर्याद क्षमता आहे. आम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ज्ञता, संशोधन आणि विकास याला भारताची प्रतिभा आणि व्याप्तीशी जोडण्यावर भर दिल्याचे मोदी यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये झालेले स्थायिक झालेले सुमारे १८ लाख भारतीय हे आमच्या भागीदारीतील एक महत्त्वाचा दुवा आहेत. ब्रिटीश समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेत त्यांच्या मौलिक योगदानामुळे दोन्ही देशांदरम्यान मैत्री, सहकार्याला नवी दिशा मिळाल्याचेही मोदी यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील भागीदारी विश्वसनीय आहे, त्याला प्रतिभा आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याचेही मोदी म्हणाले.
युक्रेन संघर्षावर चर्चा
आजच्या बैठकीत प्रशांत क्षेत्र, पश्चिम आशिया क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही आम्ही चर्चा केली.
युक्रेन संघर्ष आणि गाझाच्या मुद्द्यावर शांतता पुनर्स्थापित करण्यासाठीच्या संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे.
प्रशांत क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
खनिज सहयोगासाठी उद्योग संघ
भारत आणि ब्रिटनने महत्त्वपूर्ण खनिजांसंदर्भात सहयोगासाठी एक उद्योग संघ तसेच पुरवठा साखळी यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा ‘सॅटेलाईट कँपस’ आयएसएम धनबाद येथे असेल. तसेच हवामान विषयक तंत्रज्ञान स्टार्टअप निधीची स्थापना केली आहे. यातून हवामान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम तंत्रज्ञान या संदर्भात काम करणारे दोन्ही देशांचे संशोधक आणि उद्योजकांना संधी मिळेल.
लष्करी प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
संरक्षण विषयक सहकार्यात एक पाऊल पुढे टाकत आम्ही लष्करी प्रशिक्षणाच्या संदर्भात सहयोगाबाबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार भारतीय हवाईसेनेचे उड्डाण मार्गदर्शक ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील. एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत ही बैठक होत आहे आणि दुसरीकडे आमच्या नौदलांची संयुक्त सराव सुरू आहे, हा एक योगायोग आहे, असेही मोदी म्हणाले.