मुंबई: वंचित बहूजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप आणि मित्रपक्षांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची तयारी ठेवली आहे. काँग्रेसनेही हा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी वंचित आघाडीचे प्रयत्न आहेत. मात्र अद्याप कोणताही संपर्क काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून साधण्यात न आल्याने भाजपने काँग्रेसला काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

विधानसभा, लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात आले. मात्र काही ना काही कारणाने दरवेळी वंचितसोबतची युती काही ना काही कारणामुळे फिस्कटली आहे. त्यामुळे सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता काँग्रेस आणि भाजपेतर इतर पक्षांसमोर युतीचा प्रस्ताव ठटेवला आहे. मात्र कोणताच प्रतिसाद न आल्याने प्रकाश आंबेडकर यांनी थेट टीकेचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी समाज माध्यमावर संदेश पाठवत काँग्रेसने संपर्क न साधल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर पक्षांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत! हे मी २१ मे रोजी सांगितले होते आणि माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनी सुद्धा १८ जून रोजी तेच सांगितले होते. पण, आजपर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी या संदेशात नमूद केले आहे. त्यांनी भाजपला लक्ष्य करताना. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. तसेच भाजपकडे काँग्रेसविषयी असं काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपला घाबरत आहे? असाही सवाल करीत यामागे भाजप असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास त्याचा लाभ दोघांनाही होणार आहे. दलित, इतर मागासवर्ग, मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसंघांमध्ये विशेष करून याचा फायदा होण्याची शक्यता असल्याने प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेससोबतच्या युतीची चाचपणी केली आत आहे.