मुंबई : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाशी संबंधित वादाप्रकरणी एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या चित्रपट निर्मिती कंपनीने अभिनेता-निर्माता महेश वामन मांजरेकर यांच्यासह चित्रपटांच्या अन्य निर्मात्यांविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, चित्रपटाशी संबंधित स्वामित्त्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे, न्यायालयानेही कंपनीच्या याचिकेची दखल घेऊन कंपनीसाठी चित्रपटाचे २० ऑक्टोबर रोजी विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश मांजरेकर आणि अन्य निर्मात्यांना दिले आहेत.

कंपनीच्या याचिकवर शुक्रवारी न्यायमूर्ती सोमाशेखर सुंदरेसन यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. त्याचवेळी, या विशेष प्रदर्शनानंतरही चित्रपटाबाबत काही आक्षेप असल्यास एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटला सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने याचिका प्रलंबित ठेवताना प्रामुख्याने स्पष्ट केले. बंधनकारक अशा कायदेशीर कराराचे, स्वामित्त्व हक्कांसंबंधित बाबींचे उल्लंघन केल्याचा व जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप कंपनीने याचिकेत केला आहे.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट २००९ मध्ये प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी संयुक्तपणे मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती. तसेच, त्यात एव्हरेस्टकडे चित्रपटाचे ६० टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे ४० टक्के हक्क होते.

पुढे, २०१३ मध्ये मांजरेकर यांनी ठराविक आर्थिक मोबदला घेवून त्यांचे ४० टक्के हक्क हे संपूर्णतः एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटला हस्तांतरित केले. त्यामुळे, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही कंपनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा हक्कांची एकमेव मालक बनली. त्यात प्रीक्वेल, सिक्वेल किंवा इतर मूळ विषयाशी संबंधित कलाकृती तयार करण्याच्या विशेष आणि एकाधिकार हक्कांचा समावेश आहे, असा दावा कंपनीने याचिकेत केला आहे.

तथापि, आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा पुढील भाग किंवा भाग २ आहे, चित्रपटाचे नाव, लोगो आणि फलक डीझाइन या सर्व गोष्टी मूळ चित्रपटाशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. त्याशिवाय, अनेक प्रसिद्धी मजकूर, मुलाखती आणि बातम्या यामध्ये देखील ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा उल्लेख २००९ च्या मूळ चित्रपटाचा ‘भाग २’ म्हणून करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच, हा प्रकार मूळ चित्रपटाच्या प्रतिष्ठेचा आणि लोकप्रियतेचा फायदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, असा आरोप कंपनीने केला आहे.