मुंबई : पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासाठी काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट ) आणि दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट ) देण्यात आला असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पावसाने सोमवारी मुंबई, पुणे आणि सोलापूरसह राज्याच्या आणखी काही भागात वाटचाल केली. संपूर्ण तामिळनाडू व्यापून बंगळूरूसह कर्नाटकच्या काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना

नागरिकांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन घराबाहेर पडावे. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असेल तर शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागानेकेले आहे.

मुंबईत यंदाही मोसमी पाऊस लवकरच

यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वीच मुंबईत दखल झाल्याची माहिती हवामान विभागाने सोमवारी दिली. गेल्या जवळपास ६९ वर्षांच्या नोंदींनुसार मुंबईत यंदा सर्वांत लवकर पाऊस दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली.

पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कुठे…

अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट)रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरअतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)रायगड, पुणे, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड

मुसळधार पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)मुंबई, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा