मुंबई : सायबर भामटे विविध प्रकारची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे सुशिक्षत नागरिकही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते. अंधेरी येते वास्तव्यास असलेल्या एका वृध्द महिलेला सहा तासांत दामदुप्पट रक्कम देतो असे सांगून सायबर भामट्याने गंडवले. विशेष म्हणजे ही महिला बॅंकीग क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला ६९ वर्षांच्या असून अंधेरीत राहतात. त्यांच्या तीन मुली परदेशात स्थायिक आहेत. त्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून निवृत्त झाल्या आहेत. सध्या त्या एका बॅंकेच्या खासगी विमा कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. सायबर फसणुकीबाबत त्या जागरुक असतात. मात्र त्या सायबर जाळ्यात अडकल्या.
फेसबुकवर गुंतवणुकीचे व्याख्यान
तक्रारदार महिलेला परदेशी चलनामध्ये गुंतवणूक करायची होती. त्यासाठी १७ ऑगस्ट रोजी त्या फेसबुकवरील पेजवर व्याख्यान ऐकत होत्या. या व्याख्यानात परदेशी चलनात गुंतवणूक केल्यास कसा झटपट फायदा होतो ते सांगण्यात येत होते. त्या पेजवरील अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. परदेशी चलनात गुंतवणूक केल्याने त्यांना कसा फायदा झाला याचा त्यात उल्लेख होता. काही वेळानंतर त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
सहा तासांत पाचपट पैसे
या व्यक्तीने महिलेला परदेशी गुंतवणूकीबाबत माहिती दिली. तीच माहिती फेसबुकवरील व्याख्यानात होती. त्यामुळे या महिलेचा विश्वास बसला. गुंतवणूक केल्यास सहा तासांत पाचपट रक्कम दिली जाईल अशी थाप त्या व्यक्तीने मारली. या महिलेला ते खरे वाटले. सहा तासांसाठी पैसे गुंतविण्यास काय हरकत आहे, असा त्यांनी विचार केला आणि गुगल पेद्वारे त्या व्यक्तीला २१ हजार रुपये पाठवले.
२४ तासांत पुन्हा फसवणूक
सहा तास उलटल्यानंतरही त्या महिलेला गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा मिळाला नाही. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दुसऱ्या क्रमांकावरून त्यांना फोन आला. तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम कमी असल्याने परतावा मिळाला नाही, अशी थाप फोन करणाऱ्याने मारली. महिला पुन्हा त्या भूलथापांना बळी पडली आणि तिने २५ हजार रुपये पाठवले. दिवस मावळला तरी पैसे परत मिळाले नाहीत. या महिलेची एकूण ४४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड), तसेच फसवणुकीच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.