मुंबई : मागील दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील मोसमी पाऊस मात्र यंदा १० ऑक्टोबरपर्यंत सक्रीय राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. यामुळे मुंबई, ठाणे तसेच पालघर भागांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाची उघडीप असली तरी अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात दोन वेळा वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण होऊन दोन्ही वेळा त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘संगीत देवबाभळी’चे विश्वविक्रमी महोत्सवी प्रयोग

हेही वाचा – “हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

यंदा २५ सप्टेंबरपासून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवासाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईत मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास हा साधारणपणे ८ ऑक्टोबरपासून सुरु होतो. मात्र मागील काही वर्षे यामध्ये सातत्याने बदल दिसत आहेत. मुंबईत २०२२ मध्ये मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास हा २३ ऑक्टोबर रोजी सुरु झाला होता तर २०२१ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी मोसमी वारे परतले. हवामान विभागाच्या आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार २०२० मध्ये सर्वात उशिरा म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return journey of rain in mumbai after october 10 mumbai print news ssb