मुंबई : एकेकाळी वृद्धावस्थेत होणारा संधीवाताचा त्रास आता तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संधिवाताची समस्या वाढताना दिसत आहे.यासाठी वेळीच निदान, जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रियांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना सक्रिय जीवन जगता येणे शक्य आहे. जगभरात १२ ऑक्टोबर हा ‘जागतिक संधिवात दिवस’ पाळला जात असून तरुणांनो आता जागे व्हा, असा संदेश या निमित्ताने तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतामध्ये “वृद्धांचा आजार” म्हणून ओळखला जाणारा संधीवात (ऑस्टिओआर्थ्रायटिस) आता तरुणांनाही गाठत आहे. एकेकाळी ६० वर्षांवरील लोकांपुरता मर्यादित असलेला हा विकार आता ४० ते ५० वयोगटात झपाट्याने वाढताना दिसतोय. ताज्या वैद्यकीय अभ्यासानुसार देशात सध्या सुमारे ६ कोटी २० लाख लोक संधीवाताने त्रस्त आहेत. त्यापैकी अंदाजे १.५ ते २ कोटी रुग्ण हे ५० वर्षांखालील आहेत.म्हणजेच कामकाजाच्या वयातील लोकसंख्येचा मोठा भाग या वेदनादायक आजाराच्या छायेखाली आहे.
वैद्यकीय संशोधन संस्थांच्या आकडेवारीनुसार १९९० मध्ये भारतात संधीवाताचे २३ दशलक्ष रुग्ण होते. केवळ तीन दशकांत हा आकडा तिप्पट झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात संधीवाताचे ५२ कोटीहून अधिक रुग्ण असून त्यापैकी ७३ टक्के वयोवृद्ध आहेत. उर्वरित जवळपास एक चतुर्थांश तरुण आणि मध्यमवयीन लोक आहेत.
सध्या २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे मुंबईतील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित ग्रोव्हर यांचे म्हणणे आहे. दर महिन्याला ओपीडीमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या १० पैकी ४ व्यक्तींना सांधेदुखी आणि संधिवाताशी संबंधित कडकपणाची लक्षणे दिसून येतात. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसुन राहणे, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पध्दत, दुखापती, लठ्ठपणा, स्वयंप्रतिकार स्थिती, कौटुंबिक इतिहास आणि ताण हे घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. सांधे कडक होणे, वेदना, सूज, उष्णता, हाडांची लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. जर संधिवाताकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन वेदना, सांध्यांमधील विकृती, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे जीवनशैलीतील बदल या आजाराची प्रगती रोखण्यात मदत करतात असे त्यांनी सांगितले.
बरेच तरुण सांध्यामधील कडकपणा किंवा वेदनेकडे दुर्लक्ष करतात, परंतु ही संधिवाताची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. तरुणांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिन्याभरात १० पैकी २ व्यक्ती सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा यासारख्या समस्या घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतात असे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीसनत राव यांनी सांगितले. लवकर निदान केल्याने सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास, वेदना कमी करण्यास आणि दीर्घकालीन नुकसान टाळण्यास मदत होते. वेळोवेळी फिजिओथेरपी, औषधं आणि प्रगत उपचार प्रक्रिया रुग्णांना दीर्घकालीन आराम देतात आणि अपंगत्व टाळण्यास मदत करतात. नियमित शारीरिक हालचाली, निरोगी, संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि वैद्यकीय उपचारांनी या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका असेही डॉ राव म्हणाले.
पूर्वी ६० वर्षांवरील रुग्णांमध्ये संधीवात दिसायचा.आता ३५-४५ वयोगटातही हे निदान वाढले आहे. ही गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या बनत चालल्याचे ठाणे जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ विलास साळवे यांनी सांगितले.अयोग्य जीवनशैली, वजनवाढ, बसून राहण्याची सवय आणि अपुरी शारीरिक हालचाल हे तरुणांमधील संधीवाताचे प्रमुख कारण ठरत आहेत. याशिवाय, क्रीडा दुखापती आणि कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ बसण्याच्या पद्धतींमुळेही गुडघे व सांधे झिजतात. संधीवात आता केवळ वृद्धापकाळाशी निगडीत आजार राहिला नाही तर तो नव्या पिढीच्या जीवनशैलीचा परिणाम बनला आहे. सरकारी आरोग्य धोरणांमध्ये या वाढत्या संधीवाताच्या रुग्णसंख्येकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही डॉ विलास साळवे यांनी सांगितले.