मुंबई : शिवडी येथे सुरू होणाऱ्या अटल सेतूपासून ५० फुटाच्या अंतरावर पूर्वमुक्त महामार्गखालील रस्ता मंगळवारी रात्री ११.३० वाजता २० फूट लांब व १५ फूट खोल खचला. यामुळे अटल सेतूवरून खाली उतरल्यावर शिवडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अटल सेतू बांधताना या रस्त्याखालून जाणाऱ्या नाल्याची दुरुस्ती करण्याची तयारी एमएमआरडीने दाखवली होती, मात्र मुंबई महानगरपालिका व मुंबई पोर्ट ट्रस्टकडून सहकार्य न मिळाल्याने नाल्याची दुरुस्ती झाली नाही. परिणामी, हा रस्ता खचल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मुंबईबाहेर अवघ्या १५ मिनिटांमध्ये जाण्यासाठी सरकारने अटल सेतू बांधला, मात्र हा सेतू बांधताना त्याच्यापासून अवघ्या ५० फुटावर पूर्व मुक्त महामार्गखालून जाणाऱ्या मेसेट रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्याखालून अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यातून शिवडी पूर्वेकडील सर्व सांडपाणी शिवडी खाडीमध्ये सोडण्यात येते. हा नाला अटल सेतूच्या बाजूने जात असल्याने भविष्यात सेतूला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी एमएमआरडीने अटल सेतूचे बांधकाम करताना या नाल्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी रस्त्याची मालकी असलेल्या बीपीटीकडे व त्याखालील नाल्याचे बांधकाम केलेल्या मुंबई महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांकडे नाल्याचा आराखडा मागितला होता.

मात्र या दोन्ही यंत्रणांनी आराखडा नसल्याचे एमएमआरडीएला कळवले होते. त्यामुळे एमएमआरडीएने अटल सेतूलगतच्या नाल्याची डागडुजी केली, मात्र आराखड्याअभावी नाल्याचे पुढील काम केले नाही. यंदा पावसाळ्यामध्ये पूर्व मुक्त महामार्गावरील पाणी खाली पडून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच जवळपास ४० ते ५० वर्षापूर्वी बनवलेला हा रस्ता मंगळवारी रात्री ११.३० वाजता अचानक खचला. मुंबई महानगरपालिका व बीपीटी या सरकारी यंत्रणांच्या समन्वयातील अभावच रस्ता खचण्यामागील कारण असल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे.

रस्ता खचल्यासंदर्भात गुरूवारी मुंबई महापालिका, एमएमआरडीए, शिवडी पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि बीपीटी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत बीपीटीने नाल्याच्या कामासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले. मात्र या नाल्यातून राडारोडा काढून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर या कामाचा प्रस्ताव तयार करून नाल्याचे काम होण्यासाठी साधारणपणे एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे.