RSS door to door campaign: मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात मुंबई व कोकणात अधिक जाळे विणण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून नोव्हेंबर -डिसेंबर या काळात स्वंयसेवक घरोघरी संपर्क अभियान राबविणार आहेत. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांचे फेब्रुवारी महिन्यात मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे.

देशातील सरासरी ९८ टक्क्यांपेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये रा. स्व. संघाचे संघटन व शाखांचे जाळे विणले आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण सरासरी ९२ टक्के आहे. कोकणात मात्र हेच प्रमाण ६६ टक्के आहे. देश व राज्याच्या तुलनेत कोकणात संघाचे जाळे कमी आहे. मुंबईत स्थलांतरितांचे प्रमाण अधिक असल्याने मुंबईचा समावेश असलेल्या कोकण प्रातांचे संघटन काही प्रमाणात कमी असल्याचे संघाच्या कोकण प्रांताच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. शताब्दी वर्षात मुंबईसह कोकणात शाखा आणि एकूणच संघटन वाढविण्यावर भर असल्याचे कोकण प्रांत विभागाच्या उच्चपदस्थांकडून पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगण्यात आले.

शताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर मुंबई व कोकणात वर्षभर विविध आठ उपक्रम राबविण्याची योजना आहे. २३ नोव्हेंबरपासून डिसेंबर अखेरपर्यंत घरोघरी संपर्क साधून समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना रा. स्व. संघाच्या कार्याची माहिती दिली जाईल. यात उद्योगापासून वेगवेगळ्या क्षेत्रांमधील प्रभाव पाडणाऱ्या घटकांचा समावेश असेल. किती घरांना भेटी द्यायच्या याचे काही लक्ष्य निश्चित करण्यात आलेले नाही, पण जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही सांगण्यात आले.

शताब्दी वर्षात सर्वसामान्याांच्या जीवनाशी निगडीत विषयांवर जनजागृती करण्याबरोबरच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल. पर्यावरण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यावर प्लॅस्टिकचा वापर टाळावा, पाणी बचत, वृक्षारोपण व वृक्षांचे जतन असे विषय हाती घेतले जातील. समाज परिवर्तन, स्वदेशीचा अधिक वापर, कुटुंबव्यवस्था या विषयांचा समावेश असेल. शेजारील नेपाळमधील युवकांचा प्रकट झालेला रोष किंवा दोनच दिवसांपूर्वी लडाखमध्ये असाच झालेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर युवकांशी संवाद व त्यांच्यात जागृती घडविण्याचा विशेष प्रयत्न असेल. हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्याचे प्रयत्न होतात किंवा काही असामाजिक शक्ती सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना आळा कसा घालता येईल या दृष्टीने लोकांशी संवाद साधण्यात येणार आहे. समाजात काही प्रमाणात निर्माण झालेली नकारात्मकता दूर करण्यावरही भर राहणार आहे.

भागवतांचे व्याख्यान

शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांची व्याख्याने देशातील महानगरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील नवी दिल्लीतील व्याख्यान पार पडले. मुंबई, बंगळुरू, कोलकाता या शहरांमध्येही अशी व्याख्याने होणार आहेत. यापैकी मुंबईतील व्याख्यान हे ७ व ८ फेब्रुवारी रोजी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होईल, अशी माहिती देण्यात आली.