Shivsena Sanjay Raut Convicts Defamation Case : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत यांना न्यायालयाने २५ हजार रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेधा यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असे राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला. या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा यांची तक्रार योग्य ठरवली. तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली.

हे ही वाचा… Pune Rain Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द; ‘हे’ दिलं कारण!

मीरा भाईंदर येथील १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

राऊतांचे आरोप बदनामीकारक

पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे, चित्रफितींचा विचार करता राऊत यांनी मेधा यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांनी केलेले विधान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऐकले आणि वर्तमानपत्रातून वाचले. राऊत यांच्या वक्तव्यामुळे मेधा यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असल्याचे त्यांनी सादर केलेल्या पुराव्यातून सिद्ध होते. त्यामुळे, राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले.

हे ही वाचा… ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मेधा यांचा दावा काय होता ?

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला, असे मेधा यांनी तक्रारीत म्हटले होते. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही मेधा यांनी केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut convicted sentenced to 15 days imprisonment by court in medha somaiya toilet defamation case mumbai print news asj