Sanjay Raut On Marathi vs Marwadi Conflict : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या सरकाच्या शपथविधीच्या हालचाली सुरू आहेत. अशात काल मुंबईमध्ये एका व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तो एक महिलेला मुंबईत आता भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे मारवाडीत बोलायचे, असे म्हटल्याचे ऐकू येत आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य करत, मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातात मुंबई सोपवण्याची भूमिका कोणी घेतली असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

मुंबईत व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर, या प्रकरणातील महिलेने घटनेबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी मारवाडी व्यापाऱ्याच्या दुकानात गेले. त्याने मला मारवाडीतच बोलायला सांगितले. तेव्हा मी असे का म्हणून विचारले. त्यावर तो म्हणाला भाजपा सरकार आले आहे. मारवाडीत बोलायचे. मराठीत बोलायचे नाही. ‘मुंबई भाजपाची, मुंबई मारवाडींची…’ यावर आता तोडगा काय?” असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : “इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया

काय म्हणाले संजय राऊत?

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती, मारवाडी आणि जैन बांधवांना मराठी माणसाच्या विरोधात उभे करण्याचे काम या लोकांनी केले. मुंबईवरील मराठी माणसाचा पगडा पुसून टाकून, मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातामध्ये या राज्याची राजधानी सोपवण्याची भूमिका कोणी घेतली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून मराठी माणसांसाठी काम करत आलो आहे. मुंबई विविध भाषिक लोक अनेक वर्षांपासून राहत आले आहे. पण मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा आहे.”

हे ही वाचा : “मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातात मुंबई सोपवण्याची…” मराठी-मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजपा लक्ष्य

होणारे मुख्यमंत्री हा सर्व प्रकार कसा सहन करत आहेत

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हटले की, “मुंबई मराठी मासणाच्या त्यागातून निर्माण झाली आहे. जमीन खोदली तरी तुम्हाला मुंबईसाठी मराठी माणसांचेच रक्त सांडल्याचे पाहायला मिळेल. राज्यात भाजपाचा विजय होताच, महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी बोलायचे नाही अशा धमक्या देण्यात येत आहेत. हे सर्व घडत असताना महाराष्ट्राचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हा प्रकार कसा सहन करत आहेत”, राऊत यांनी असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेत टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला असून, उद्या ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. यामध्ये महायुतीतून भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले असून, आज रात्रीपर्यंत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.