भाजपाचे आमदार अतुल भातखळर यांनी ‘एक तीर दो निशाना’, साधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. भातखळर हे सत्ताधाऱ्यांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. “नाना पटोले म्हणतात महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचेच नाही तर राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत?, असे नानांना सुचवायचे आहे का?” असा खोचक टोला भाजपा आमदार अतुल भातखळर यांनी लगावला आहे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भातखळर पुढे म्हणाले, “प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरातील कडी बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झाला आहे.”

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले होते. काँग्रेस पक्ष २०२४ मध्ये स्वबळावर आपली सत्ता महाराष्ट्रात आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. यावर शरद पवार यांनी मी लहान माणसांबद्दल बोलत नाही, असे म्हणत थेट पटोलेंना टोला लगावला होता. यावरून विरोधक चांगलीच टीका करत आहेत.

स्वबळावर लढण्याच्या घोषणेने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीने नापसंती व्यक्त केली असतानाही, २०१४च्या धर्तीवर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, कोणताही धोका नको म्हणूनच स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे  नाना पटोले यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.

काय म्हणाले होते नाना पटोले

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, असेही पटोले म्हणाले. वेळ येईल तेव्हा मी स्वत: पवार यांना भेटेन परंतु ती वेळ अद्याप आली नाही, असे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडणार. मी काही शिवसेना वा राष्ट्रवादीवर हल्ला करीत नाही, तर भाजपवर करतो,” असे पटोले म्हणाले होते. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. नाना पटोले आणि शरद पावार यांच्यात नाराजीचे वातावरण असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

शरद पवार आमच्यावर नाराज नाही आहेत

दरम्यान, हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न नाना पटोले करत आहेत. काँग्रेसची सायकल रॅली दरम्यान बोलतांना ते म्हणाले, “शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. माझा पक्ष वाढवणे माझा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवार आमच्यावर नाराज नाही आहेत. भाजपाकडून महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यासोबत गेलेले नेते पळून जाऊ नयेत म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. संघटना आणि सरकारमध्ये फरक असतो. सर्वच जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचा कोणी विरोध करण्याचे कारण नाही,” असे नाना पटोलेंनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar also the remote control of recovery asked bjp leader srk
First published on: 15-07-2021 at 17:01 IST