मुंबई : भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. दुबे यांच्या वक्तव्याचा शरदचंद्र पवार पक्षाकडूनही निषेध करण्यात आला असून घाटकोपर येथे मंगळवारी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दुबेंविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. घाटकोपर येथे दुबेंच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे (शिंदे) नेते व गृह राज्यमंत्री योगेश कदम, पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही दुबे यांचा निषेध केला.

ही लढाई फक्त निशिकांत दुबेंपुरती नाही, ही लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मराठी भाषेचा व अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही. भाजपकडून महाराष्ट्राला जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिली जात आहे. निवडणुकीसाठी समाजात तेढ पसरवणे ही भाजपची सवय असल्याचा आरोप अमोल मातेले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, मयूर केणी, तालुका अध्यक्ष प्रशांत कालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.