मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना महिला कार्यकर्त्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. डिसेंबरमध्ये पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाज पक्षापासून दूरावला होता, तो पुन्हा पक्षाबरोबर जोडला जात आहे, असा दावाही तटकरे यांनी या वेळी केला.
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची आढावा बैठक गुरुवारी महिला विकास मंडळाच्या सभागृहात पार पडली. सर्व समाज घटकांतील महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत २३८ जागा मिळाल्या आहेत, असेही तटकरे म्हणाले.
आढावा बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला संघटना बांधणीबाबतची माहिती दिली. ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, राजश्री भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माया कटारिया, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई अध्यक्षा आरती साळवी, कार्याध्यक्षा मनीषा तुपे तसेच राज्यातील जिल्हाध्यक्षा, शहराध्यक्षा, कार्याध्यक्षा, निरीक्षक यांचीही उपस्थिती होती.
‘राष्ट्रवादीची रणरागिणी घराघरात पोहोचवा’
स्थानिक स्वराज्य संस्था कामाची पहिली पायरी असते. आगामी निवडणुकीत महिलांना संधी मिळू शकते. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेत जाण्याची संधी असते. त्यातून तुमचे नेतृत्व उभे राहू शकते. विविध योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची रणरागिणी घराघरात पोहोचवा, असे आवाहन पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष पहिल्या क्रमांकावर आणायचा असेल तर स्री शक्तीशिवाय शक्य नाही, असे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले.