काही लोक केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरतात, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली होती. मुख्यमंत्र्याच्या या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “शिवसेनेची स्थापना कधी झाली हे ज्याला माहित नाही..” ‘तो’ व्हिडीओ दाखवत संजय राऊतांवर नितेश राणेंची टीका

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“मुख्यमंत्री हे स्वत:ला सर्वसाधारण असल्याचं म्हणतात. पण सर्वसाधारण शेकऱ्याच्या शेतात हेलिकॉप्टर उतरत नाही. ज्या गावात ज्यायला साधे रस्ते सुद्धा नाही, त्यात गावात मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहेत. यावर आधी मुख्यमंत्र्यांनी बोलावं”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.

“…याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं”

“दुसऱ्यांना हपापलेली माणसं म्हणताना मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावं की भारत गोगावलेंचे चिरंजीव, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि रामदास कदमांचे चिरंजीव हे राजकारणात आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर ४० पैकी १५ आमदारांच्या कुटुबियांना युवासेना आणि इतर पदांवर नियुक्त केलं आहे. मग कुटुंबासाठी हपापलेपणा कोण करतंय याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Barsu Refinery Protest : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक

मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

“मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

“जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरं. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे”, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare replied to cm eknath shinde tweet on uddhav and aditya thackeray spb