मुंबई: रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती पाचुंदकर आणि त्यांचे पती दत्ता पाचुंदकर यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली. भाजप वॉशिंग मशीन असल्याची बाब आता जुनी झाली असून भाजपचा प्रवास आता वॉशिंग मशीन ते धोबी घाट असा झाल्याची टीका मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी केली आहे.

रांजणगाव येथील महागणपती देवस्थानच्या परिसरात झालेल्या कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून पाचुंदकर दाम्पत्य वादाच्या भोवऱ्यात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी सरपंच असताना सरकारी कागदपत्रांत फेरफार करून तब्बल ७२ गुंठे शासकीय जमीन सासऱ्यांच्या नावावर केली. २००८-०९ मध्ये झालेल्या या बेकायदेशीर हस्तांतरणातून १८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महसूल विभागाने ही जमीन सरकारजमा करण्याचा निर्णय घेतला होता.

अशा घोटाळ्यांच्या आरोपांची पार्श्वभूमी असलेल्या पाचुंदकर यांना पक्षात प्रवेश देण्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारी जमीन लाटल्याचा आरोप असलेल्या स्वाती पाचुंदकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप हे एक असे वॉशिंग मशीन आहे की ज्यात नेत्यांचे गुन्हे आणि भ्रष्टाचार कपड्यांपेक्षाही स्वच्छ धुवून निघतात. आरोप असलेले नेते आत जातात आणि बाहेर येतात जणू काही घडलेच नाही. अशा प्रकारे दोष झाकले जातात, चेहरा चमकदार होतो आणि जनतेचा मात्र फक्त विश्वासघात होतो, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, जमीन घोटाळ्यात अडकलेल्या या दाम्पत्यावर रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. राजकीय व्यक्तीला ट्रस्टचे अध्यक्षपद स्वीकारता येत नाही. असे असतानाही स्वाती पाचुंदकर यांनी हे पद वर्षभरापासून आपल्याकडे ठेवले आहे.