मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडवली. अनेक भागात पाणी साचले. रेल्वे गाड्यांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबई आणि ठाण्यातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात मंगळवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत दडी मारलेल्या पावसाची रविवारी मध्यरात्रीपासून रिपरिप सुरू झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर वाढला. कुलाबा, दादर, परळ, प्रभादेवी, भायखळा, मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, शीव, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, अंधेरी, सांताक्रूझ या भागांत पावसाचा जोर अधिक होता. दुपारनंतर पावसाची तीव्रता आणखी वाढली. रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली आणि नोकरदारांना घर गाठण्यासाठी कसरत करावी लागली.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ४२.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६९.६ मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबर रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे १००.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ८६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठाण्यात नागरिकांची तारांबळ

ठाणे जिल्ह्यात दिवसभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली. ठाणे, भिवंडी, कल्याण, बदलापूर येथील काही सखल भागात पाणी साचले. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी विलंब झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात निघालेल्या विद्यार्थ्यांचा वाहतूक कोंडीमुळे हिरमोड झाला. अनेक ठिकाणी वृक्ष, संरक्षण भिंती पडण्याच्या घटना घडल्या. ठाण्यातील घोडबंदर, श्रीरंग गृहसंकुल परिसरात काही सखल भागात पाणी साचले.

दिवसभरात १८ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात विविध दुर्घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. अतिवृष्टी, पूर, अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ४ जण हे पुणे जिल्ह्यात पूल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ठार झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात चार, जळगावमध्ये चार, रायगडमध्ये तीन, बुलढाण्यात दोन, तर ठाण्यात एकाचा मृत्यू झाला.

तापमानात घट

●पावसामुळे मुंबईच्या तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २८.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

●दोन्ही केंद्रावरील तापमान सरासरीपेक्षा ३ अंशानी कमी नोंदले गेले. मुंबईतील अंधेरी सब वे, शीव गांधी मार्केट, भांडूप एलबीएस मार्ग, चेंबूर शेल कॉलनी, मानखुर्द, पवई, चुनाभट्टी, कुर्ला, धारावी आदी ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते.

●त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मंगळवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पूर्व उपनगर

६८ मिमी

पवई

६२ मिमी

कुर्ला

५६ मिमी

मानखुर्द