Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू झाले आहे. यासाठी विविध भागातून आंदोलक आझाद मैदानात दाखल होत आहे. मुक्त मार्गावर ( फ्री वे) मोठी गर्दी झाली आहे. पुढे मार्ग बंद असल्याने वाहनचालक रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे पूर्वमुक्त मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. यासाठी मराठा क्राती मोर्चा शूव-पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे तसेच अटल सेतू मार्गे आझाद मैदान येथे जात आहे. या मोर्च्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले होते. मात्र अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने आंदोलक आपल्या वाहनाने मुंबई येऊ लागले आहेत.

पूर्वमुक्त मार्ग ठप्प

मुक्त मार्गावरुन आंदोलक आझाद मैदानात जाणार होते. मात्र पुढे तो मार्ग बंद झाला आहे. यामुळे हजारो संतप्त कार्यकर्ते मुक्त मार्गावर ठिय्या मांडून बसले आहेत. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुक्त मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कार्यालयात जाणारे नागरिक मुक्त मार्गावर अडकून पडले आहेत. या मार्गावरून पाठवून पोलिसांनी आम्हाला फसवले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका आंदोलकांनी व्यक्त केली.

आम्ही ४ दिवस मुलाबाळांना सोडून आलेलो आहोत, तुम्हाला एक दिवस घरी बसायला काय झाले, असा सवाल आंदोलक वाहनात अडकलेल्या नागरिकांना विचारत होते. पोलिसांनी या आंदोलनाची कल्पना द्यायला हवी होती, असे मीना देसाई यांनी सांगितले.

ट्रेन मध्ये प्रचंड गर्दी

आंदोलक विविध भागातून ट्रेनमधून येत आहेत. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी झाली आहे. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन आंदोलकांनी भरल्या आहेत.‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा दिल्या जात आहेत. भगवे टी शर्ट आणि टोपी घातलेले कार्यकर्ते घोषणा देत आहेत.