मुंबई : राज्यात सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटासाठीच्या मोफत वर्धक मात्रा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांत म्हणजेच शुक्रवार आणि शनिवारी तब्बल २ लाख आठ हजार जणांनी ही मात्रा घेतली.  काही दिवसांत हा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एक हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे. करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जुलैपासून लसीकरणाचा वेग कमी झाला होता.  परंतु १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू झाल्याने पुन्हा हे प्रमाण वाढू लागले असून शुक्रवारी सुमारे दीड लाख, तर शनिवारी १ लाख ९५ जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये सुमारे ५० टक्क्यांपेक्षाही जास्त लसीकरण हे वर्धक मात्रेचे आहे. वर्धक मात्रेचे शून्य लसीरकरण असलेल्या अकोल्यात १ हजार २९७, भंडारामध्ये १ हजार २११, गडचिरोली  १६३, गोंदिया  १०४९, हिंगोली  ४८४, नांदेड  ८८५, परभणी १ हजार १०७, सिंधुदुर्ग १ हजार ४१२, वर्ध्यात १ हजार २९७ आणि यवतमाळमध्ये ९३० जणांनी वर्धक मात्रा घेतली.

मुंबई आघाडीवर..

सशुल्क लस परवडत नसलेल्या नागरिकांना मोफत मात्रा उपलब्ध झाल्याने केंद्रावर गर्दी वाढत आहे. शनिवारी मुंबईत १८ ते ५९ वयोगटातील २० हजार २५६, ठाण्यात १६ हजार २५७ तर पुण्यात १६ हजार २५७ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

राज्यात ‘बीए.४’  आणि ‘बीए.५’ चे १९ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात बी ए.५ चे १८ आणि बीए. ४ चा एक असे ओमायक्रॉनच्या दोन्ही उपप्रकारांचे १९ रुग्ण आढळले. याशिवाय  बीए. २.७५ चे १७ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. पुण्याच्या बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील इन्साकॉगअंतर्गत प्रयोगशाळांमध्ये केलेल्या जनुकीय चाचण्यांच्या अहवालामध्ये हे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण २५ जून ते ४ जुलै या काळात करोनाबाधित झाले होते. त्यांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १३२ झाली आहे.

यात पुण्यातील ८४, मुंबईतील ३३, नागपूर, ठाणे ,पालघर येथे प्रत्येकी चार आणि रायगड जिल्ह्यतील तीन रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील बीए. २.७५ च्या एकूण रुग्णांची संख्या ५७ झाली आहे. यात पुण्यात ३७, नागपूरमध्ये १४, अकोल्यात चार, तर ठाणे आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. राज्यात २ हजार जणांना संसर्ग राज्यात नवीन रुग्णांच्या संख्येत घट कायम राहिली असून रविवारी २ हजार १८६ रुग्ण नव्याने आढळले. तर २ हजार १७९ रुग्ण करोनामुक्त झाले. रविवारी तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन मृत्यू मुंबईत आणि एका मृत्यूची नोंद चंद्रपूरमध्ये झाली.

मुंबईत ३९७ रुग्ण करोनामुक्त

मुंबईतील करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता तीनशेच्याही खाली गेला आहे. बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी शहरात ३९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर २७६ नवे रुग्ण आढळले.  तर ३९ आणि २९ वर्षीय तरुणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यात १४८ नवे बाधित

ठाणे : जिल्ह्यात रविवारी १४८ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी नवी मुंबई ५९, ठाणे ४४,कल्याण-डोंबिवली २१, मीरा-भाईंदर आठ, उल्हासनगर सात, ठाणे ग्रामीण सहा आणि भिवंडीमध्ये तीन करोना रुग्ण आढळले. तर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.