विकास महाडिक, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : भाजपबरोबर जवळीक साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही उत्तर भारतीयांच्या मतांचा विचार करून भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांना चार हात लांब ठेवण्याची भूमिका घेतली आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता ठाकरे गटाबरोबर युती करण्याची मागणी मनसे नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून उद्धव ठाकरेही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामानिमित्ताने राज यांच्याबरोबर आघाडीसाठी पुढाकार घेणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांची भाजपबरोबर जवळीक वाढत असल्याची चर्चा होती. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने भाजप मनसे युती होणार, असे वातावरण निर्माण झाले होते.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन खंदे साथीदार मिळाले आहेत. त्यामुळे भाजपबरोबर युती होण्याची आशा मावळल्याने  नव्या आघाडीची मनसेला गरज वाटू लागली आहे. उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी यापूर्वी दोन वेळा मनसेने हात पुढे केला होता. पण एकसंध असलेली शिवसेना आणि अडीच वर्षे सत्तेवर असल्याने एक आमदार असलेल्या मनसेची उद्धव ठाकरे यांना गरज वाटली नाही.

कार्यकर्त्यांचा आग्रह

* या दोन भावांनी एकत्र यावे यासाठी मनसे व शिवसैनिकांनी मध्यंतरी मुंबईत फलकबाजी केली होती. आता तरी दोन भावांनी एकत्र यावे महाराष्ट्र आपली वाट पाहात आहे, अशा आशयाचे हे फलक होते.

* मनसे- शिवसैनिकांच्या दुसऱ्या फळीतील काही नेत्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. दोन्ही भावांची गरज म्हणून आता हे पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सरू झाल्या असून गेली अनेक वर्षे राज ठाकरे यांनी टाळीसाठी पुढे केलेल्या हातावर उद्धव ठाकरे टाळी देणार असल्याचे समजते.

* राज्यातील निवडणुकीत या दोन पक्षांच्या युतीनंतर मराठी मतांची विभागणी टाळणे शक्य होणार आहे. याचा फायदा हा मुंबई पालिकेत शिवसेनेला होण्याची जास्त शक्यता आहे. * बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज ठाकरे यांच्याकडे असलेल्या बाळासाहेबांच्या सभा, कार्यक्रम व भाषणांच्या ध्वनिफिती देण्याची विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानिमित्ताने दोन्ही भावांमध्ये संभाषण सुरू होऊन दुरावा संपेल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav raj thackeray coming together for balasaheb thackeray memorial zws