मुंबईः जगातील पहिल्या दहा बँकांमध्ये भारतीय बँकांनी स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न आता करावेत. जागतिक स्पर्धेत उतरण्याचे मोठे लक्ष्य राखून, त्या लक्ष्यपूर्तीसह स्वतःचीही वाढ साधावी, असे आवाहन केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे बोलताना केले.
एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस बेस्ट बँक पुरस्कार’ सोहळ्याचे मुख्य अतिथी या नात्याने ते बोलत होते. बँकांना आता त्यांच्या वाढीपुरते नियोजन करू नये, तर अधिक मोठे लक्ष्य राखून, आकारमान व व्याप्ती वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. त्यांच्या हस्ते देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका, कार्यकारी संचालक अनंत गोएंका उपस्थित होते.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केवळ बँकिंग क्षेत्रात नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात जोमाने सुधारणा राबविल्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळातील धोरणलकव्याकडून, सुदृढ धोरणाचालित कारभाराचा आदर्श निर्माण केला. १० वर्षांच्या काळात दीर्घोद्देशी सुधारणांच्या या स्तंभावर २०४७ साली ‘विकसित भारता’चा संकल्प करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या या संकल्पाबाबत जनसामान्यांतील आस्था पाहता, तो २०४७ पूर्वीच पूर्णत्वाला जाईल असा विश्वास असल्याचे शहा म्हणाले. अनेक देश एक ते दोन टक्के विकासदराने मार्गक्रमण करत असताना भारताने सात ते आठ टक्के विकासदर कायम ठेवला आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताकडे एक उज्ज्वल बिंदू म्हणून पाहिले जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
बँकिंग क्षेत्रात मोदी सरकारच्या काळात तब्बल ८६ सुधारणा राबविण्यात आल्या. गत काळात सामान्य बनलेल्या ‘फोन बँकिंग’ प्रथेला अनुसरून, २००८ ते २०१४ दरम्यान तब्बल ५२ लाख कोटी रुपयांचे कर्ज बेपर्वाइने वितरित केले गेले होते. पुढे या कर्जाची वसुली थकली आणि बुडीत कर्जाचे संकट बँकांपुढे निर्माण झाले. दुसरीकडे देशातील ६० कोटी कुटुंबांत एकाही सदस्याचे बँकेत खाते नव्हते. मोदी सरकारने देशातील गरिबातील गरीब जनतेचा बँकिंग व्यवस्थेत समावेश होईल, याची काळजी घेतली.
बँकिंग व्यवस्थेतील वंचित जनघटकांची ५६ लाख जन-धन खाती, त्या खात्यात जमा २.६४ लाख कोटी रुपयांची बचत, खातेधारकांमध्ये ३७ कोटी ‘रुपे’ कार्डधारक हे बँकिंग क्षेत्रात गत १० वर्षांत राबविलेल्या सुधारणांचे मूर्तरूप आहे. बँका आता भ्रष्टाचार, निष्काळजीपणा, पारदर्शकतेचा अभाव या रोगांपासून मुक्त होऊन जोमाने वाढ साधत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बँकिंग व्यवस्थेला स्वच्छ करण्यासाठी दाखविलेल्या दृढ बांधिलकीचा हा परिणाम आहे.
१९९४ ते २००३ या काँग्रेस सरकारच्या काळात बँकांतील बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण १६ टक्के होते. पुढे २००४ पर्यंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्याचे प्रमाण ७.८ टक्क्यांवर घसरले. पुन्हा १० वर्षांच्या यूपीएप्रणीत काँग्रेस सरकारच्या काळात त्याने चिंताजनक १९ टक्क्यांचे रूप धारण केले. मात्र २०१४ नंतर मोदी सरकारच्या १० वर्षांत बँकांची बुडीत कर्जे २.५ टक्के वा त्याहून कमी झालेली दिसत आहेत. गत २५ वर्षांतील या महत्त्वपूर्ण सुधारणा हा देशाच्या बँकिंग व्यवस्थेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामागील विचार आणि प्रयत्नांची शिकस्त हा एक संशोधनाचा विषय असून, बँकांनीच त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शहा यांनी केले.
‘एमएसएमई’च वाढीचे केंद्र
देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना कर्ज वितरणाला बँकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले. ‘एमएसएमईं’च्या कर्जविषयक गरजांना बँकांनी महत्त्व दिले नाही, तर देशाच्या विकासपथाला त्यांच्याकडून झालेला तो अडथळा ठरेल, अशा शब्दांत त्यांनी श्रोत्यांमध्ये उपस्थित बँकप्रमुखांना सुनावले. रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी आणि टोरेन्ट समूह यांनी छोट्या उद्योगाच्या रूपात सुरुवात करून आज विशाल रूप धारण केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘महाबँक’ सर्वोत्तम सरकारी बँक!
‘एफई बेस्ट पुरस्कार’ सोहळ्याच्या सन्मानार्थींमध्ये खासगी व सरकारी बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी), लघु वित्त बँका आणि फिनटेक यांचा समावेश होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी उपाध्यक्ष एस. रामादुरई यांच्या अध्यक्षतेखालील आणि स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश खरा यांचा सहभाग असलेल्या परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड केली. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून या सोहळ्यात बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक) निवड करण्यात आली. महाबँकेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी निधू सक्सेना यांनी हा पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते स्वीकारला. अन्य पुरस्कारार्थींमध्ये – कोटक महिंद्र बँक (सर्वोत्तम खासगी बँक), ‘बँकर ऑफ द इयर’ म्हणून ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी अमिताभ चौधरी आणि फेडरल बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी श्याम श्रीनिवासन यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.