मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावाच लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांत ३ लाख ६१ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणी चिंतेने ग्रासले होते. तसेच, धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महानगरपालिकेने ५ जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे, भिवंडी – निजामपूर महानगरपालिका व आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, धरणांतील पाणीसाठ्यात आता वाढ होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.

हेही वाचा >>> महावितरणची वीज खरेदी वादात; निविदा अटींमध्ये एका कंपनीच्या सोयीसाठी बदल केल्याची चर्चा

मोडकसागर धरणातील पाणीसाठा आता ३७.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, तानसामधील पाणीसाठा ४९.९९ टक्के, मध्य वैतरणातील २३.८९ टक्के, भातसातील २४.६६, विहारमधील ४५.७१, तुळशीतील ६६.२४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आजघडीला धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. १३ जुलै २०२२ रोजी धरणांमध्ये ८ लाख ११ हजार ५२२ दशलक्ष लिटर म्हणजे ५६.०७ टक्के इतका पाणीसाठा होता. याच दिवशी २०२३ मध्ये धरणांमध्ये ४ लाख १२ हजार ९५७ दशलक्ष लिटर म्हणजे २८.५३ टक्के पाणी होते. तर, यंदा केवळ ३ लाख ६१ हजार ८२५ दशलक्ष लिटर (२५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water storage reached upto 25 percent in dams after continue rain zws