Worli Hit and Run Case : बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मिहीर शाहचा रक्ताचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याने मद्यप्राशन केलं नव्हतं, असं यात म्हटलं आहे. ७ जुलै रोजी झालेल्या या भीषण अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवाचा मृत्यू झाला होता. अत्यंत निर्घृणपणे मिहीरने कावेरीला मृत्यूच्या दाढेत ओढलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता आणि मद्य प्राशन केल्याचे त्याने तोंडी मान्य केले होते. मात्र मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वरळीतील हिट अँन्ड रन प्रकरण काय आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार, हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. परंतु, आता आलेल्या अहवालानुसार त्याने मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. जवळपास तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक केली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं.

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका

आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख या दोघांनी नाखवा कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं होतं. त्यानंतर, आदित्य ठाकरे म्हणाले, “तुम्ही कुठेही बुलडोझर चालवा. मात्र मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? हे पाहणं गरजेचं आहे. नरकातून राक्षस आला तरीही अशी कृती करणार नाही, तितकी वाईट ही केस आहे. अनेक लोक सांगतील की नुकसान भरपाई वगैरे देतो. पण त्यांना एक रुपया नकोय. त्यांना मिहीर शाह याला शिक्षा झालेली बघायची आहे. धडक दिल्यानंतर मिहीर शाह जर थांबला असता तरीही कावेरी नाखवांचा जीव वाचला असता. नाखवा कुटुंब प्रचंड दुःखात आहे. इतकी भयंकर गोष्ट मुंबई, महाराष्ट्रात ही गोष्ट घडू शकते हे पाहूनच दुर्दैवी वाटतं. गुन्हेगार असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन तुम्ही त्याला तुरुंगात टाकू शकता पण असा राक्षस असेल तर काय करणार? मिहीर राजेश शाह राक्षसच आहे. इतकं भयानक हे कृत्य आहे. ६० तासांनंतर जी अटक झाली आहे. त्याला साठ तास का लपायला दिलं? गृहखातं का शांत आहे, गृहमंत्री का शांत आहेत? ” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला होते. त्यामुळे त्याचा रक्ताचा अहवाल आता निगेटिव्ह आल्याने अनेक शंका कुशंकांना वाव मिळाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli hit and run case mihir shahs blood sample report shows negative for liquore sgk