नागपूर : १ मार्च ते १४ मे २०२४ दरम्यान राज्यातील ३२ जिल्ह्यात कमी-अधिक संख्येने (१ ते २८ रुग्ण) एकूण २४१ उष्माघातग्रस्तांची नोंद झाली. यातील सर्वाधिक रुग्ण जालना, नाशिक, बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, राज्यात १ मार्च ते १४ मे २०२४ दरम्यान उष्माघाताचे २४१ रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक २८ रुग्ण जालना, २७ रुग्ण नाशिक, २१ रुग्ण बुलढाणा, २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत. सोलापूर १८, परभणी १२, नागपूर ११, सिंधुदुर्ग १०, उस्मानाबादला ९ रुग्णांची नोंद झाली.

पुणे, यवतमाळ, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ७ तर गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी ६ रुग्ण आढळले. अकोला जिल्ह्यात ५ तर अहमदनगर ३, अमरावती ३, औरंगाबादमध्ये ३ रुग्ण नोंदवले गेले. बीड, चंद्रपूर, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी २ तर भंडारा, हिंगोली, पालघर, रत्नागिरी, सांगली, वाशीम जिल्ह्यातही प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. या सगळ्यांवर यशस्वी उपचार झाल्याने सध्या राज्यात एकही उष्माघातग्रस्ताच्या मृत्यूची नोंद नाही. या वृत्ताला सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य संचालक कार्यालयाने दुजोरा दिला.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाची अदलाबदली; आईच्या सतर्कतेमुळे भोंगळ कारभार उघडकीस

उष्माघात म्हणजे काय?

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार उष्णतेच्या तीव्रतेशी निगडित जे आजार आहेत, त्यांना उष्माघात म्हटले जाते. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाते आणि शरीरातील एक एक अवयवय निकामी होतात, ज्यामुळे रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची परिस्थिती निर्माण होते किंवा त्याचा मृत्यूही ओढवतो, अशा परिस्थितीला उष्माघात म्हटले जाऊ शकते. शरीर उच्च तापमानाचा सामना करत असताना आर्द्रतेचे प्रमाण वाढते, त्याच वेळी शरीराच्या हालचाली वाढल्या तर शरीराच्या आतील तापमान स्थिर राहत नाही, ज्यामुळे उष्माघाताचा त्रास जाणवू लागतो. उष्माघात हा एक गंभीर स्वरूपाचा धोकादायक आजार असून ज्याचा मृत्युदरही अधिक आहे.

उष्माघाताची लक्षणे काय?

थकवा, झटका, ग्लानी, भूल, लक्ष न लागणे, स्मृतिभ्रंश, परिस्थितीचे आकलन न होणे आणि नीट बोलता न येणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. या लक्षणांसोबतच डोकेदुखी, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारखी इतर गंभीर लक्षणेही दिसू लागतात.

हेही वाचा…शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील तीन जणांना फाशीची शिक्षा

उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक

उष्माघात टाळण्यासाठी तीव्र उन्हापासून स्वतःला लांब ठेवावे आणि सतत पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेत राहावेत. ज्यामुळे उष्णतेच्या झळांमुळे उद्भवणारे त्रास टाळता येतील. लिंबू सरबत, ताक, भाताची पेज किंवा लस्सी यांसारखे द्रव पदार्थ घ्यावेत. दिवसाच्या ज्या वेळेत उन्हाची तीव्रता जास्त असते, त्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात तहान लागल्यासारखे वाटत नसले तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे. अंगावर हलक्या वजनाचे आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. थेट उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी टोपी, हलक्या रंगाचा स्कार्फ किंवा ओढणी आणि छत्री वापरावी.