बुलढाणा : कृषिप्रधान जिल्हा ही बुलढाणा जिल्ह्याची ब्रिटिश काळापासूनची ओळख. मात्र मागील कमी अधिक दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी बुलढाणा जिल्ह्याची दुर्देवी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या २०-२२ वर्षांपासून शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी मालिका आजतागायत कायम आहे. पाऊस चांगला पडो वा कमी, सुकाळ असो वा ओला-कोरडा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या ठरलेल्याच…
यंदाचे वर्षही याला अपवाद नाही. आजचा गुरुवार (दि. २४) या शेतकरी आत्मघात मालिकेतील एक काळा दिवस ठरावा. याचे कारण, हाडाचे आणि कष्टाळू शेतकरी असलेल्या एका शेतकरी दाम्पत्याने एकत्रच आत्महत्या केली. आपल्या शेतातील झाडाला वेगवेगळ्या ठिकाणी गळफास लावून घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शेतकरी म्हणून नशिबी आलेले भोग, यातना, दुःख असह्य झाल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
यामुळे कृषिप्रधान बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरलाय! चिखली तालुक्यातील भरोसा येथे आज गुरुवारी, २४ जुलैला सायंकाळी हा दुर्दैवी आणि कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणणारा भीषण घटनाक्रम घडला. या घटनेत शेतकरी पती-पत्नीने शेतात झाडाला गळफास घेऊन सोबतच जीवनयात्रा संपवली. गणेश श्रीराम थूट्टे (५५) आणि रंजना गणेश थूट्टे (५०) अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्याची नावे आहेत.
या शेतकरी दाम्पत्याने आज सायंकाळी गट नंबर ३१७ मधील शेतातील दोन वेगवेगळ्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. घटनेच्या वेळेस त्यांची सून बकऱ्या चारायला गेलेली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर समाजमन हळहळले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शेतीत सातत्याने होणारे नुकसान, हुमणी अळीने गेलेले सोयाबीन यामुळे ते चिंतेत होते, अशी चर्चा आहे. आज संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा होऊ शकला नाही. यामुळे त्यांच्या सामूहिक आत्महत्येबद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
‘भरोसा’ हे शेतकरी आणि शेतकरी चळवळीचे केंद्र असलेले गाव आणि चिखली तालुका अक्षरशः हादरला आहे. गावावर शोककाळा पसरली असून थुट्टे परिवार व नातेवाइकांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस कर्मचारी भरोसा गावात दाखल झाले. पोलिसांकडून चौकशी सुरू असून तूर्तास याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.